सांगली : खात्यावर पुरेशी रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याबद्दल नेहा राजेंद्र संकपाळ (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) या महिलेला 3 महिने साधी कैद व 2 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी रोहिणी सं.पाटील यांनी सुनावली. नेहा संकपाळ यांनी दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची जादा शिक्षा भोगण्याचे आहेत. तसेच दंडाची रक्कम भरपाई म्हणून सागर डुबल यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादीतर्फे अॅड. एस. के. सनदी व अॅड. एच. डी. जावीर यांनी काम पाहिले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : नेहा संकपाळ यांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. फिर्यादी सागर श्रीकांत डुबल (रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांच्या त्या मावस बहीण आहेत. नेहा यांना व्यवसायामध्ये आर्थिक अडचण आल्याने त्यांच्यामागे गुंतवणूकदारांनी तगादा लावला होता. म्हणून त्यांनी सागर डुबल यांच्याकडून उसनवार पैसे मागितले होते.सागर डुबल यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचे मित्र सागर गोसावी यांच्याकडून उसनवार स्वरूपात 1 लाख 50 हजार रुपये घेऊन बहीण नेहा यांना दिले होते. तीन महिन्यांमध्ये ती रक्कम परत करण्याचे आश्वासन नेहा यांनी सागर यांना दिले होते. त्यानंतर सागर यांनी अनेकवेळा मागणी करूनदेखील नेहा यांनी ती रक्कम परत दिली नाही. या उसनवार रकमेच्या परतफेडीपोटी नेहा यांनी बँक ऑफ बडोदा, शाखा कोल्हापूर या बँकेच्या त्यांच्या खात्यावरील धनादेश सागर यांना 9 जुलै 2023 रोजी दिला. सागर यांनी तो धनादेश त्यांच्या कॅनरा बँकेतील खात्यावर जमा केला असता खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश न वटता परत आला होता. सागर यांनी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.