Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव

धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
 

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जैन समुदायाने आयोजित केलेल्या या भव्य कार्यक्रमाला शेकडो भाविक आलेले होते. सगळे भक्तिमय वातावरण तल्लीन असतानाच व्यासपीठावर मांडलेल्या पूजेच्या ठिकाणचा सोन्याचा मंगल कलश चोरीला गेला. मंगल कलश घेऊन फरार होणारा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून तो अनेकवेळा तिथे आला. रेकी केली आणि नंतर संधी मिळताच चोरी केली. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान लाल किल्ला परिसरात जैन समुदायाकडून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. दररोज पूजा, आरती, भजन-कीर्तन सुरू होते. रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळीही भाविक मोठ्या संख्येने आले होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरही हजर होते.

७६० ग्रॅम सोने, १५० ग्रॅम हिरे जडीत कलश
जो मंगल कलश चोरीला गेला आहे, तो ७६० ग्रॅम सोन्यापासून बनवलेला असून, त्यावर १५० ग्रॅम हिरे आणि इतर रत्न आहेत. या कलशाची किंमत १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा कलश व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या पूजेच्या ठिकाणी ठेवलेला होता. सगळ्यांच्या लक्ष असलेल्या ठिकाणावरून चोराने तो लंपास केला.

कधी केली चोरी?

मंगळवारी सकाळी ९.२० ते १० वाजेच्या दरम्यान, भजन-कीर्तन आणि पूजा सुरू होती. त्याचवेळी कलश दिसला नाही. सुरूवातीला सगळ्यांना वाटलं की, तो सुरक्षित ठिकाणी ठेवला असेल, पण सगळी चौकशी केल्यावर तो चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. सिव्हिल लाईन्समध्ये राहणारे आणि कार्यक्रमाचे आयोजक सुधीर जैन यांनी तातडीने ऑनलाईन तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून माहिती घेतली आणि तपास सुरू केला.

आरोपीने अनेक दिवस केली रेकी
पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सीसीटीव्हीमध्ये आरोपी एका थैलीमध्ये कलश घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अनेकवेळा ठिकाणाची रेकी केली. तो दररोज धोतर घालून येत होता. भाविकांच्या गर्दीत फिरत होता. पूजेच्या ठिकाणी बसणाऱ्याशीही तो बोलत होता. आयोजक पुनीत जैन यांनी दावा केला की, याच व्यक्तीने यापूर्वी तीन वेळा पुजारी बनून मंदिरांमध्ये चोरी केली आहे. त्यांनी मागील तिन्ही गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले.

पोलिसांनी कार्यक्रमातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी आरोपी सहजपणे कार्यक्रमात आणि पूजेच्या ठिकाणी वावरताना दिसत आहे. संधी मिळताच तो कलश उचलतो आणि निघून जातो. उत्तर दिल्लीचे पोलीस आयुक्त राजा बन्थिया यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.