Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरण; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढणार?

सांगली :- कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरण; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढणार?
 

सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा अवधूत वडार यांच्या कुटु्ंबियांनी दिलाय.

काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता. कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झालाय, असा आरोप अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी केलाय. याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. जर गुन्हा दाखल केला नाहीतर आत्महत्या करू असा इशारा अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय.
 
अभियंता अवधूत वडार यांचा मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांनी केलाय. बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला. यातूनच हा घातपात घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबाकडून करण्यात आलाय.
 
दरम्यान याप्रकरणी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू,असा इशारा मृत अभियंत्याची बहीण रविना वडार यांनी दिलाय. दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार, आमदाराचा पीए म्हणवणारा एकजण आणि जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर दबाव टाकला जात होता, असा आरोप अभियंत्याच्या कुटुंबाने केलाय.

अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता. त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते, असा आरोप अवधूतच्या चुलत्याने केला होता. याच कारणातून अवधूतने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असाही संशय कुटुंबांनी व्यक्त केलाय. जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.

शुक्रवारी अवधूत वडार हे जत येथून निघाले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाहीत. यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना सांगलीमधील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रेस्क्यू टीमने नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसानी तपास केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा असल्याचे समोर आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.