समुद्राखाली फायबर ऑप्टिकल केबल तुटली; अनेक देशांमध्ये इंटरनेट संकट, आशियापासून युरोपपर्यंत सर्वत्र खळबळ
तुमचा इंटरनेट स्पीड अचानक कमी झाला आहे का? तुम्हाला स्मार्टफोन, कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या येत आहे का? मग यामध्ये तुमच्या नेटवर्कचा कोणताही दोष नाहीये. कारण, केवळ तुम्हालाच नाही तर जगातील कोट्यवधी लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. हो, जगभरातील अनेक देशांमध्ये इंटरनेट स्लो झाले आहे. समुद्रात पाण्याखालील ऑप्टिक केबल्स तुटल्याचं वृत्त समोर आलं आहे. या केबल कटमुळे त्यामुळे जगभरातील अनेक देशांना इंटरनेट स्लो होण्याची समस्या भेडसावत आहे.
रेड सीमध्ये केबल कट झाल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण झाली आहे. आशियापासून युरोपपर्यंतच्या अनेक युजर्सला इंटरनेटच्या समस्या भेडसावत आहेत. लाल समुद्रात टाकलेली केबल जगभरातील इंटरनेट अॅक्सेससाठी खूप महत्त्वाची आहे. युरोप आणि आशिया दरम्यान चालणाऱ्या इंटरनेटचा मोठा भाग या केबल्सशी जोडलेला आहे. यामुळेच सध्या जागतिक इंटरनेट ट्रॅफिकपैकी 17% सेवा विस्कळीत झाली आहे. नुकसान झालेल्या केबल्समध्ये SEACOM/TGN-EA, AAE-1 आणि EIG सारख्या प्रमुख सिस्टीमचा समावेश आहे, ज्यामुळे अनेक देशांमधील डेटा प्रवाहाचा मोठा भाग विस्कळीत झाला आहे.
मायक्रोसॉफ्टचे युजर्सला फटका
इंटरनेट केबल तुटल्याने मायक्रोसॉफ्टच्या Azure वर मोठा परिणाम झाला आहे. याबद्दल, मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की Azure युजर्सला विशेषतः आशिया आणि युरोप दरम्यान समस्या येऊ शकतात. कंपनीच्या मते, या केबल्स दुरुस्त करण्यासाठी वेळ लागू शकतो, म्हणून ते सध्या इतर मार्गांनी डेटा पाठवून काम करत आहेत. युजर्सला भेडसावणाऱ्या या समस्येचा प्रभाव कमी करण्याचा ते सतत प्रयत्न करत आहेत.
केबल तुटण्याचे कारण काय?
अधिकाऱ्यांना अद्याप केबल्स कसे कापले गेले हे शोधता आलेले नाही. लाल समुद्रात मागील घटनांमध्ये अनेकदा व्यावसायिक जहाजांनी टाकलेल्या अँकरमुळे असे होते, परंतु काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून केबल कट केल्याचाही संशय आहे. या भागात सुरू असलेल्या वादामुळे, तज्ञांना संशय आहे की, महत्त्वाच्या डिजिटल पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे, ज्यामुळे जागतिक कनेक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो.
भारत-पाकिस्तानमधील इंटरनेट सेवेवर परिणाम
इंटरनेट अॅक्सेसवर लक्ष ठेवणारी कंपनी नेटब्लॉक्सने म्हटले की, लाल समुद्राखाली बसवलेल्या अनेक केबल्समधील बिघाडामुळे अनेक देशांमध्ये इंटरनेट कनेक्शन मंदावले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचाही समावेश आहे. कंपनीने म्हटले की, सौदी अरेबियातील जेद्दाहजवळील SMW4 आणि IMEWE केबल सिस्टीममधील बिघाड हे याचे कारण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.