मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज (दि.२१) याबाबतची घोषणा केली. २०२३ साठी दिला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार २३ सप्टेंबर राेजी प्रदान केला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर करत म्हटले, "मोहनलाल यांचा चित्रपट प्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. या महान अभिनेत्याला, दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे." हा पुरस्कार २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रदान केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नऊ राज्य पुरस्कार, पद्मभूषण आणि पद्मश्री यांनी सन्मानित झालेले मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना आता दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारत सरकारने सोशल मीडियावर ही घोषणा केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोहनलाल यांना या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल अभिनंदन केले.
भूमिका जिवंत करणारा अभिनेता
मोहनलाल यांची ओळख केवळ दाक्षिणात्य अभिनेते अशी नाही तर देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच आजवर त्यांनी अनेक दिग्गज दिग्गदर्शकांबरोबर अनेक भूमिका साकारल्या. त्यांचा नैसर्गिक आणि सहजशैलीतील अभिनय क्षमता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. त्यांचा जन्म २१ मे १९६० रोजी केरळमधील पतनमथिट्टा जिल्ह्यातील एलांतूर येथील सरकारी कर्मचारी विश्वनाथन नायर आणि शांताकुमारी यांच्या घरी झाला. शालेय जीवनात त्यांनी नाटकांमध्ये सक्रियपणे सहभागी घेतला. इयत्ता सहावीत असताना त्यांच्या शाळेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे दहावीच्या मुलांसाठी दिला जाणार पुरस्कार पटकावत त्यांनी शालेय जीवनातच आपला पुढील प्रवास निश्चित केला होता. १९७८ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट 'थिरनोत्तम' ठरला;पण सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपांमुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.
पहिले यश खलनायक म्हणून, 'उयरंगलिल'ने दिली स्वतंत्र ओळख
मोहनलाल यांनी १९८० मध्ये 'मंजिल विरिन्न्या पूक्कल' या चित्रपटात साकारलेली खलनायकाची भूमिका गाजली. १९८३ मध्ये, त्यांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'उयरंगलिल' चित्रपटने त्यांना अभिनेता म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करुन दिली. दिग्दर्शक मित्र आणि कॉलेजमधील सहपाठी प्रियदर्शन यांच्या पहिल्या चित्रपट 'पूचक्कोरु मुक्कुत्ती' मध्ये विनोदी भूमिका साकारली.त्यांच्या काही उल्लेखनीय भूमिकांमध्ये 'सनमनसावुल्लरकु समादानम' (गोपालकृष्ण पणिक्कर), 'टी.पी. बालकृष्णन एम.ए.' (बालागोपालन), 'नमुक्कू परक्कन मुंतिरी तोप्पुकल' (सॉलोमन), 'नादोडिक्कट्टू' (दसन), 'थूवानथुम्बिकळ' (जयकृष्णन), 'चित्रम' (विष्णू), 'किरीडम' (सेतु माधवन), 'सदयम' (सत्यनादन), 'भारतम' (गोपी), 'देवासुरम' (मंगलास्सेरी नीलाकंदन) आणि 'स्फटिकम' (थॉमस चॅको) यांचा समावेश आहे.
'वानाप्रस्थम' ठरला मैलाचा दगड
मोहनलाल यांनी 'वानाप्रस्थम'मध्ये साकारलेली कथ्थकली कलाकाराची भूमिका ही त्यांच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरली. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कथ्थकली हा नृत्य प्रकार शिकणे हे खूपच कठोर साधना मानली जाते. काही वर्षांच्या सरावानंतर हा नृत्य प्रकार आत्मसात केला जातो. मात्र मोहनलाल यांनी अवघ्या काही महिन्यात कथ्यकली नृत्य प्रकार आत्मसात करत मोहनलाल यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम ठरली., कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय चित्रपटांमध्ये भरतनाट्यम आणि कथ्थक सादर करणे असो की, कलरीसारख्या मार्शल आर्ट्सचे पडद्यावर त्यांनी केलेले प्रदर्शन त्यांच्या वास्तववादी अभिनयाचे दर्शन घडवते.
विविध पुरस्काराने सन्मानित
आजपर्यंत पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नऊ राज्य पुरस्काराने सन्मानित झालेले मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.२००१ मध्ये, भारतीय सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २००९ साली, भारतीय प्रादेशिक सेनेने त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल हे पद दिले. एका अभिनेत्याला भारतीय प्रादेशिक सेनेने मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्याची घटना भारतीय चित्रपट इतिहासात प्रथमच घडली होती. याच वर्षी त्यांना श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.