इस्लामपूर : बुधवारी सकाळी लग्न... नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती... पण मंगळवारची रात्र त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरली. भावासह मित्रमंडळी रिल्स बनविण्यास गेल्याने तोही एका मित्राला सोबत घेऊन शूटिंग पाहण्यासाठी गेला. सकाळी लग्न असल्याने मित्रमंडळींनी त्याची चेष्टामस्करीही केली. काही वेळ थांबून रात्री उशिरा तो मित्रासह घरी परतत होता. याचवेळी इस्लामपूर बसस्थानकासमोर मोटारीने त्याच्या दुचाकीस धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला.
आकाश चंद्रकांत बाबर (वय 27, रा.
पेठनाका, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र हर्षद बापू सकटे
(21, रा. पेठनाका) गंभीर आहे. त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. अपघातानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. आकाश
याचा चुलत भाऊ प्रसाद बाबर याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आकाशचा भाऊ व काही मित्र रिल्स बनाविण्यासाठी खांबे मळा परिसरात गेले होते. उत्सुकतेपोटी तोही रिल्स शूटिंग पाहण्यासाठी खांबे मळा परिसरात मित्रासोबत गेला. काही वेळ थांबून दोघेही पेठनाक्याकडे परतत होते. पेठ-सांगली रस्त्यावर इस्लामपूर बसस्थानकासमोर विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारीने (एमएच 06 एएफ 4247) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. त्यामुळे आकाश व हर्षद रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोटारचालकाने चुकीच्या दिशेने मोटार चालवून अपघात केल्याने नागरिक संतप्त झाले. काहींनी मोटारीचा पाठलाग केला, मात्र दत्त टेकडी परिसरात मोटार सोडून देऊन चालक पसार झाला. आकाश याला इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
आकाश हा सुरुल येथील खासगी कंपनीत कामाला होता. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.
चार महिन्यांत चौघांचा बळी
पेठ-सांगली रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहने भरधाव वेगाने जात आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका ते प्रशासकीय इमारतीपर्यंत अनेक ठिकाणी दुभाजकामधून रस्ता ओलांडण्यासाठी जागा सोडली आहे. त्यामुळे वाहने मार्ग बदलण्यासाठी वेगात चुकीच्या दिशेने जातात. त्यामुळे सातत्याने अपघात होतात. चार महिन्यांत अपघातात चौघांचा बळी गेला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.