मुंबई, दिनांक १०: सांगली जिल्ह्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची कसून चौकशी करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जमिनीच्या व्यवहारातील कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी देऊन मंत्रालयात झालेल्या बैठकीत या संदर्भात तातडीने चौकशी करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. २०२३ ते २०२५ या कालावधीत सांगली
जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
आमदार गोपीचंद पडळकर, मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक, तसेच सांगलीचे
जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
'सर्जन रियालिटीज'च्या व्यवहारांवर संशय
या वादग्रस्त प्रकरणात सर्जन रियालिटीज प्रा. लि. या कंपनीने पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, कंपनीने कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन करून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त जमिनीची खरेदी केली आहे. यामुळे कंपनीचे अनेक व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, कंपनीने ज्या दराने जमिनी खरेदी केल्या, त्याच दराने त्या परत कराव्यात.
महसूलमंत्र्यांचे कठोर निर्देश
महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून सखोल चौकशी करण्याचे आदेश सांगली जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. तसेच, कंपनीचे जमिनी संदर्भातील नवीन व्यवहार थांबवून, मागील व्यवहारांची तपासणी करण्याचे निर्देश दिले. जर या व्यवहारांमध्ये काहीही अनधिकृत आढळले, तर जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. तसेच, संबंधित जमिनींचे सर्वे नंबर ब्लॉक करण्याचे आदेशही देण्यात आले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांच्या जमिनींचे हक्क सुरक्षित राहण्यास मदत होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.