उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत आता आणखी एक मोठी अपडेट आली आहे. आधीच बीजेडी आणि बीआरएस या दोन राजकीय पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला असताना, आता शिरोमणी अकाली दलाने देखील, आज(९ सप्टेंबर) होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
शिरोमणी अकाली दलाने निवडणुकीच्या पूर्वसंध्येस हा निर्णय जाहीर केला आहे. शिवाय, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे कारण पंजाबमधील पूर आपत्ती असल्याचे सांगितले गेले आहे. खरंतर अकाली दलाच्या केवळ एकच खासदार हरसिमरत कौर या आहेत. त्या अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्या भटिंडा येथून विजयी झालेल्या आहेत.
तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत अकाली दलने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पंजाब आणि पंजाबच्या लोकांनी देशातील प्रत्येक संकटात नेहमीच साथ दिली आहे. परंतु आज पंजाब स्वतः एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. राज्यातील जवळजवळ एक-तृतीयांश भाग पाण्याखाली गेला असून, घरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच, ही मानवनिर्मित दुर्घटना आहे, जी पंजाब सरकारच्या निष्काळजीपणा आणि अक्षमतेमुळे घडली आहे. राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने पंजाबी लोकांना मदत केली नाही. पंजाबी, विशेषतः शीख समुदाय, कोणत्याही सरकारी मदतीशिवाय या संकटाशी एकटा लढत आहे. ग्रामीण भागातील तरुण, गुरु साहिबांच्या कृपेने आणि प्रेरणेने धार्मिक समर्पणाने या पूरस्थितीचा सामना करत आहेत, शिरोमणी अकाली दल त्यांच्या या भावनेला आणि समर्पणाला सलाम करतो. असेही पक्षाने म्हटले आहे.पंजाब या दुर्घटनेला तोंड देत असताना, देशात आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. परंतु पंजाबमधील लोक राज्य सरकार, केंद्र सरकार आणि काँग्रेसवर खूप संतप्त आणि दुःखी आहेत, कारण कोणीही त्यांना मदत केली नाही. शिरोमणी अकाली दल पंजाबमधील लोकांच्या भावना आणि आवाजाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून, पक्षाने आज होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.