सुरत : जर तुमच्या बँक खात्यात 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक अफाट संपत्ती असेल, तर हॉटेलमध्ये टेबल साफ करणे किंवा रस्त्यावर सामान विकण्याची नोकरी करण्याची वेळ कोणावरही येणार नाही. मात्र तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यावरही कष्टाची, पैशाची किंमत समजण्यासाठी सजग उद्योजक आपल्या मुलांना कमी पगाराची कामे करण्यास सांगतात.
सुरतचे 'डायमंड किंग' म्हणून ओळखले जाणारे सावजी ढोलकिया, जे दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीला मोठे भेटवस्तू (कार आणि फ्लॅट) देण्यासाठी चर्चेत असतात, ते आता आपल्या मुलांना दिलेल्या अशाच अनोख्या शिकवणीमुळे चर्चेत आले आहेत. हरि कृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेल्या सावजी ढोलकिया यांची एकूण संपत्ती 12,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तरीही, त्यांनी आपल्या मुलाला सेल्समन (विक्रेता) आणि वेटरची नोकरी करायला लावली.
सावजी ढोलकिया यांनी आपल्या मुलांना पैशांचे खरे मूल्य समजावे यासाठी एक खास परंपरा सुरू केली आहे. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊनही, आयुष्याचे खरे मोल शिकवण्यासाठी त्यांनी त्यांना सामान्य लोकांसारखे जीवन जगण्याची अट घातली. त्यांनी आपला मुलगा द्रव्य ढोलकिया याला लंडनमधून पदवी घेतल्यानंतर कंपनीत नोकरी देण्याऐवजी वेटर आणि सेल्समनची नोकरी करण्यासाठी पाठवले. द्रव्य ढोलकियाने काही काळ बूट विक्रीच्या दुकानात तर काही काळ मॅकडोनॉल्डस्च्या आऊटलेटवर काम केले. वडिलांनी अट घातली होती की, त्याने दर महिन्याला चार नोकऱ्या बदलायच्या आहेत.
अनेक कोटींच्या संपत्तीचा वारसदार असूनही, द्रव्य ढोलकिया रस्त्यावर राहण्यास आणि लोकांशी काम मागण्यासाठी संघर्ष करण्यास मजबूर होता. त्याला दररोजची 180 रुपये मेहनताना मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, त्याला कधीकधी खाण्यासाठी पैसे मागावे लागत होते आणि 40 रुपयांचे जेवण घेणेही त्याला परवडणारे नव्हते. सावजी ढोलकिया यांचा उद्देश स्पष्ट होता: त्यांच्या मुलांना पैशांचे खरे मोल आणि सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्ष समजावा.सावजी ढोलकिया यांचा जन्म 1962 मध्ये गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील दुधला गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतले. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी 1992 मध्ये आपल्या तीन भावांसोबत मिळून हरि कृष्णा एक्सपोर्टस्ची सुरुवात केली. आज त्यांच्या कंपनीत 6,500 हून अधिक कर्मचारी काम करतात. सावजी ढोलकियांच्या या शिक्षणानंतर, त्यांचा मुलगा द्रव्य ढोलकिया आता त्यांच्या वडिलांच्या कंपनीत व्यवसाय सांभाळण्यास मदत करत आहे. अर्थातच आता त्याला आपल्या कर्मचाऱ्यांच्या स्थितीविषयीची पूर्णपणे जाण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.