Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑनलाईन बेटिंग घोटाळ्यात काँग्रेस आमदार अडचणीत; फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल 50.33 कोटींचे सोने जप्त

ऑनलाईन बेटिंग घोटाळ्यात काँग्रेस आमदार अडचणीत; फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल 50.33 कोटींचे सोने जप्त
 

बंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत  आणखी भर पडली आहे. बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या चळ्ळकेरे येथील घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल ५०.३३ कोटींचे सोने जप्त केले.

ईडीने निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यांपूर्वीही १०३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात २१ किलो सोने, रोख रक्कम, दागिने आणि आलिशान वाहने यांचा समावेश आहे. आतापर्यंत आमदार पप्पी यांच्या ताब्यातून एकूण १५० कोटींची रोकड आणि सोने जप्त केले आहे. ईडीने त्यांच्या निवासस्थानासह फेडरल बँकेतील लॉकरांची तपासणी केली. यामध्ये ४० किलो सोन्याचे बार आढळले. पप्पी आणि त्यांचे काही नातेवाईक व मित्र बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग वेबसाईटचे ऑपरेशन चालवत होते. 
 
मिळालेली रक्कम फोन-पेसारख्या डिजिटल पेमेंट गेटवेमार्फत गोळा केली जात होती. नंतर ती रक्कम म्युचुअल अकाउंट्सच्या नेटवर्कद्वारे भारतातील आणि परदेशातील ऑपरेटरकडे हस्तांतरित केली जात होती. पप्पी यांचा सुमारे दोन हजार कोटींच्या व्यवहारात सहभाग दिसून आला. सट्टेबाजीतून मिळालेली रक्कम बेकायदेशीररीत्या परदेशी बँक खात्यांमध्ये वळवली. पप्पी, त्यांचे भाऊ के. सी. तिप्पेस्वामी आणि पृथ्वीराज यांनी दुबईमध्ये कॉल सेंटर स्थापन करून ऑनलाईन गेमिंग व्यवसाय चालवला होता.

देशात, परदेशातही मोठे साम्राज्य

ईडीने कोलकाता शाखेच्या मदतीने पप्पीना सिक्कीममधील गंगटोक येथून अटक केली. त्यांना बंगळुरातील कोरमंगल येथील न्यायालयात हजर केले. सीसीएच न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली. २८ ऑगस्ट रोजी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पप्पी आणि त्यांच्या नेटवर्कने राज्यातच नव्हे, तर परदेशातही बेकायदेशीर सट्टेबाजीचे मोठे साम्राज्य उभे केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.