पिंजरा फेम अभिनेत्री आणि व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी संध्या शांताराम यांचं निधन झालंय. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्या दिग्ग्ज नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जायच्या. शिवाय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी 10.30 वाजता परळ येथील राजकमल स्टूडियो येथून निघेल. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
पिंजरा सिनेमात नायिकेची भूमिका साकारली
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अमर कलाकृती म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान टिकवून ठेवणारा चित्रपट म्हणजे 'पिंजरा'. शाळेतील शिक्षक आणि तमाशा फडातील एका नर्तकी यांच्यातील अनोख्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आजही तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. या सिनेमात संध्या शांताराम यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. व्ही शांताराम यांनी तीन लग्न केली होती. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
व्ही शांताराम यांनी संध्या यांच्याशी केला होता तिसरा विवाह
व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले. त्यांची तिसरी पत्नी संध्या या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री व कुशल नर्तिका होत्या. दुसरी पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी फारसे चित्रपट केले नसले, तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.संध्या यांनी व्ही. शांताराम यांच्यासोबत 'दो आंखें बारह हाथ' या चित्रपटात काम केले होते. याशिवाय त्यांनी 'झनक झनक पायल बाजे' आणि 'जल बिन मछली नृत्य बिन बिजली' सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मात्र, 'पिंजरा' या चित्रपटातील त्यांची भूमिका सर्वाधिक गाजली आणि आजही ती मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर मानली जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.