सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असलेले देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे एक प्रमुख नेते आहेत. भाजपाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात त्यांची परवानगी घ्यावीच लागते. त्यांनी पक्षाला निवडणूक जिंकून दिल्यामुळे त्यांचे दिल्लीतही मोठे वजन आहे. दरम्यान, सध्या देशात बिहारच्या निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, नितीश कुमार यांच्या युतीने जोर लावला आहे. हीच निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
नेमकी काय जबाबदारी सोपवली?
बिहारमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तेथील प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, ते आता प्रचारालाही लागले आहेत. दुसरीकडे निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांतर्गत रणनीती आखली जात आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपाने बिहारच्या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. म्हणजेच आता फडणवीस हे बिहारच्या निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार आहेत. बिहार राज्य पिंजून काढून ते भाजपाच्या तसेच नितीश कुमार यांच्या उमेदवारांचा प्रचार करताना फडणवीस दिसतील.
स्टार प्रचारकांच्या यादीत मोदींचेही नाव
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 स्टार प्रचारकांचे नाव आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. विनोद तावडे भाजपाचे बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी आहेत. महाराष्ट्रातून फडणवीस यांच्यासोबत तावडे यांचेदेखील या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव आहे. दरम्यान, आता फडणवीस काही दिवसांनी बिहारच्या भूमीत प्रचारसभा घेताना पाहायला मिळणार आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाकोणाची नावे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाहा, केंद्रीय मंत्री नितन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, होन यादव, स्मृती इराणी, केशव प्रसाद मौर्य, सी आर पाटील, पवन सिंह, मनोज तिवारी, रवि किशन आदी नेत्यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.