आरटीओ :- सर्वसामान्य प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवरील कारवाईने सगळेच चक्रावले, वाचा संपूर्ण प्रकरण
दिवाळी उत्सव 'कॅश'करण्यासाठी ट्रॅव्हल्स, खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारून प्रवाशांची अक्षरशः लूट चालविली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या मार्गावर ट्रॅव्हल्स संचालकांनी दुप्पट, तिप्पट तिकिटांचे दर आकारून प्रवाशांना वेठीस धरले. असे असताना येथील प्रादेशिक परिवहन
अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी चार ट्रॅव्हल्सवर कारवाईचा देखावा केला असून
प्रति बसवर केवळ पाचशे रूपये दंड आकारला आहे. त्यामुळे या थातूरमातूर
कारवाईमुळे आरटीओच्या कार्यप्रणालीवर शंका बळावली आहे.
१० ऑक्टोबर रोजी आरटीओने अमरावती ते
मोर्शी, वरुड ते पांढुर्णा, मुलताई रस्त्यावर चालणाऱ्या स्टेज कॅरेज
प्रवासी बसेसवर तसेच परतवाडा ते अंजनगाव, आकोट मार्गे अकोला, परतवाडा ते
धारणी मार्गावर धावणाऱ्या बसेसवर कारवाई केली होती. काही प्रकरण अंगलट
येण्याचे संकेत मिळाले की आरटीओचे फिरते पथक कारवाईचा देखावा करतात
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आढळून येत असताना ट्रॅव्हल्सवर नाममात्र दंड
आकारून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार चालवितात.
पंचवटी चौकातून हप्ते देऊन चालतात ट्रॅव्हल्स, खासगी वाहतूकदारांना परवानगी कुणाची ?
येथील पंचवटी चौकातून ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहतूकदार बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करतात. त्या ठिकाणचे हप्ते प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पोहचविले जातात असे त्या ठिकाणच्या दलालाकडून छातीठोकपणे सांगण्यात येते अमरावती ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा, पांढुर्णा, वरूड, मोर्शी आणि नागपूरकडे दरदिवशी ७५ ते १०० वाहनांची ये-जा करतात. पंचवटी चौक जणू खासगी वाहनस्थानक तर झाले नाही ना ? अशी शंका उपस्थित होत आहे. या चौकातून पायी चालणे कठीण झाले आहे. परिणामी पंचवटी चौकातून ट्रॅव्हल्स, खासगी वाहतूकदारांना प्रवासी वाहतुकीची परवानगी कुणी दिली, हा संशोधनाचा विषय आहे.अमरावती आरटीओच्या फिरत्या पथकाने १६ ऑक्टोबर रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास काही ट्रॅव्हल्स, खासगी वाहनांची तपासणी केली. मात्र या तपासणीत केवळ तीनच ट्रॅव्हल्सने वाहतूक नियमाचा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एमएच १४ एलएक्स ५०१०, एमएच १२ डब्ल्यूजे १७६५ आणि एमएच ३७ जे ७३७३ क्रमांकाच्या पुणे-अमरावती या तीन ट्रॅव्हल्सवर प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी एमएच १२ डब्ल्यूजे ४६१८ या क्रमांकाच्या पुणे-नागपूर अशी धावणाऱ्या एका टॅव्हल्सवरदेखील पाचशे रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली आहे.
फिरते पथक केवळ देखावा
आरटीओच्या
फिरत्या पथकाकडे भरपूर अधिकार प्रदान करण्यात आले असताना कारवाई मात्र होत
नाही. थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने फिरत्या पथकाच्या कर्तव्यावर
प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे फिरते पथक केवळ देखावा म्हणून दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.