Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली ४७ तोळे चोरी: '१०० किमी' सीसीटीव्ही फुटेज तपासले, चोरांच्या म्होरक्यास बीडमध्ये अटक!

सांगली ४७ तोळे चोरी: '१०० किमी' सीसीटीव्ही फुटेज तपासले, चोरांच्या म्होरक्यास बीडमध्ये अटक!
 

सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरून नेल्याच्या थरारक घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या झालेल्या या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर, सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.

बीडमधील 'कासारी' कनेक्शन
सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे निष्पन्न झाले. सांगली पोलिसांच्या पथकाने १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या आरोपीने (मोहन भोसला) घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले.

थरारक अटक सत्र
 
मंगळवारी रात्री आष्टी पोलिसांची मदत घेऊन सांगली पोलिसांनी कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले याला त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे पोलिसांवरील दबाव काहीसा कमी झाला असला, तरी या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार आहे.
 
तीन घरफोड्यांमध्ये तब्बल ४७ तोळे सोने चोरीला
या तीन घरफोड्यांमध्ये तब्बल ४७ तोळे सोने चोरीला गेले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 'दिवसादेखील घरात सुरक्षित नाही का?' असा प्रश्न नागरिक विचारत असताना, या आंतरजिल्हा टोळीच्या अटकेमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आष्टी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. फरार आरोपीला पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.