Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत विमानतळ उभारणीला वेगमौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळासाठी २५० ते ३०० एकर अतिरिक्त भूमी अधिग्रहणाचा निर्णय-आमदार सुधीर गाडगीळ

सांगलीत विमानतळ उभारणीला वेग मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळासाठी २५० ते ३०० एकर अतिरिक्त भूमी अधिग्रहणाचा निर्णय-आमदार सुधीर गाडगीळ
 

सांगली, दि. १४: सांगली जिल्ह्यातील मौजे कवलापूर येथे कार्गो व नागरी विमानतळ उभारणीसाठीची प्रक्रिया गतीमान करण्याचा निर्णय आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

 
या प्रकल्पासंदर्भात यापूर्वी २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री मा. सामंत यांनी मौजे कवलापूर येथील जागा विमानतळासाठी पूरक असल्याचे फिजिब्लीटी रिपोर्टच्या आधारे स्पष्ट केले होते. तसेच, आवश्यक असल्यास अतिरिक्त जागा शासनमार्फत अधिग्रहित करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली होती. आजच्या बैठकीत सादर झालेल्या अहवालानुसार, विमानतळ उभारणीसाठी अजून अंदाजे २५० ते ३०० एकर अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या भूमी अधिग्रहणासाठी मुख्यमंत्री यांच्या शिफारसीची आवश्यकता असल्याने, पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील व उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन अधिग्रहण प्रक्रियेस गती देईल, असे ठरविण्यात आले.

पालकमंत्री मा. पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे निर्देश दिले. तर उद्योग मंत्री मा. सामंत यांनी सांगली विमानतळ उभारणीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासास, गुंतवणुकीस आणि व्यापार वाढीस मोठा हातभार लागेल, असे नमूद केले. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सांगली विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीस आता वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, सांगली लोकसभा खासदार श्री.विशाल पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ,आमदार सुरेश(भाऊ) खाडे, आमदार श्री.सुहास बाबर, आमदार विश्वजीत कदम, अजित देशमुख (सहसचिव महसूल विभाग),डॉक्टर श्रीकांत पुलकुंडवार( सहसचिव उद्योग विभाग),हेमंत डांगो (उपसचिव विमान विभाग), संतोष भिसे (उप मु.का.अ.2 एमआयडीसी), कालिदास भांडेकर (मुख्य अभियंता एमआयडीसी) आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.सांगली,मुख्य अभियंता, मऔविम, पुणे,प्रादेशिक अधिकारी, मऔविम, सांगली व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.