नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या कृतीला पंतप्रधान मोदींनी "अत्यंत निंदनीय" असे म्हटले आहे. "ही घटना प्रत्येक भारतीयाला संताप आणणारी आहे, असल्याचे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले, "आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार प्रत्येक भारतीयाच्या भावना दुखावणारा आहे. आपल्या समाजात अशा कृत्यांसाठी जागा नाही. हे कृत्य पूर्णपणे निंदनीय आहे." मोदींनी म्हणाले , "या परिस्थितीत न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेले संयम आणि शांतता प्रशंसनीय आहे. न्याय आणि संविधानावरील त्यांचा दृढ विश्वास आणि निष्ठा याचे हे उत्तम उदाहरण आहे."दरम्यान, घटनेनंतर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणातील आरोपी वकिल ७१ वर्षीय राकेश किशोर यांचे वकिली परवाना निलंबित केले आहे. बार कौन्सिलचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात किशोर यांनी कोर्ट क्रमांक १ मध्ये सकाळी सुमारे ११:३५ वाजता आपले बूट काढून मुख्य न्यायमूर्तींकडे फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळेत हस्तक्षेप करून त्यांना थांबवले.बीसीआयने प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे, "सदर वकिलाचे वर्तन हे व्यावसायिक आचारसंहितेच्या, वकिली नियमांच्या आणि न्यायालयाच्या सन्मानाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे." या घटनेनंतर कायदा क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, न्यायालयीन प्रतिष्ठा आणि वकिलांच्या नैतिक जबाबदारीबद्दल पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.