कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये जबरी चोरी, गोदामाचे गज कापून ६० लाख लुटले; दीड तास चोरटे 'त्या' ठिकाणी, सीसीटीव्हीमध्ये दिसलं पण...
कोल्हापूर मार्केट यार्डातील गूळ व्यापारी अरुण चौगुले यांच्या गोदामातील खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तिजोरी फोडली आणि ६० लाख रुपये चोरीस नेले. दसऱ्यादिवशी दुकान बंद असल्याने चोरीचा प्रकार मध्यरात्री घडला.
दुकानात सीसीटीव्ही नव्हते, पोलिसांना तपासात अडथळा:
चोरीनंतर पोलिस तपासासाठी आले असता दुकानात किंवा बाहेर सीसीटीव्ही कॅमेरेच नसल्याचे उघड झाले, ज्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला. पोलिसांनी परिसरातील इतर दुकानांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
चोरटे दोन असून दीड तास वावरले - श्वान पथकाने मागील रस्त्यापर्यंत शोध घेतला:
चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून तिजोरी उघडली, रोकड घेऊन पसार झाले. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले असून, चोरटे मागील रस्त्यावरून दुचाकीवरून पळाल्याचा संशय आहे. मार्केट यार्डातील गूळ व्यापाऱ्याच्या गोदामाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेली ६० लाखांची रोकड पळवून नेली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. अडत व्यापारी अरुण शंकरराव चौगुले (वय ८१, रा. रूईकर कॉलनी) यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. व्यापाराचे तसेच जमिनीच्या व्यवहारातील रक्कम त्यांनी तिजोरीत ठेवली होती. दसऱ्यादिवशी दुपारनंतर दुकान बंद होते. मध्यरात्री एकच्या सुमारास चोरटे दुकानात शिरल्याचे परिसरातील काही सीसीटीव्हीमधून स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः फिर्यादी अरुण चौगुले यांचे गुळाचे अडत दुकान आहे. दर्शनी भागात त्यांच्यासह मुले व्यवहार पाहतात.मागील गोदाम एका नारळ व्यापाऱ्याला भाडेतत्त्वावर दिले आहे. दसऱ्यामुळे गुरुवारी (ता. २) दुकान बंद होते; परंतु, दसऱ्यानिमित्त पूजा करण्यासाठी त्यांचे दिवाणजी आले होते. पूजा आटोपून दुपारी ते परत गेले. आज सकाळी दिवाणजी व कामगार दुकानात आले असताना केबिनचे दार उचकटल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती तत्काळ चौगुले यांना दिली. त्यांनी याची माहिती पोलिसांना देताच पोलिस निरीक्षक संतोष डोके फौजफाट्यासह दाखल झाले.
सीसीटीव्हीच नाही....
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर पथकासह दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजआधारे माहिती घेण्याचा विचार केला. मात्र, चौगुले यांच्या दुकानाबाहेर किंवा दुकानात सीसीटीव्हीच नसल्याचे समोर आले. लाखोंचा व्यापार होणाऱ्या दुकानात सीसीटीव्ही नाही, हे उत्तर ऐकून वरिष्ठ पोलिस अधिकारीही आश्चर्यचकित झाले. यामुळे परिसरातील इतर व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेरील सीसीटीव्हींचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले.
श्वानपथक मागील भागात घुटमळले...
पोलिसांनी श्वान पथकाला तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलिसांचे श्वान पथक दुकानातून बाहेर पडल्यानंतर पाठीमागील रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले. चोरट्यांनी पाठीमागील बाजूस दुचाकी उभी करूनच प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहेत. चोरटे दोन असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
जमिनीच्या व्यवहाराचे २० लाख रुपये...
फिर्यादी चौगुले यांचा नातू अनुराग यांनी काही दिवसांपूर्वी एका जमिनीचा व्यवहार केला होता. यातून आलेली २० लाखांची रक्कमही त्यांनी अडत दुकानातच आणून ठेवल्याचे फिर्यादींनी सांगितले. गूळ व्यापारातील ४० लाख व नातवाचे २० लाख रुपये अशी एकूण साठ लाखांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
खिडकीतून चोरट्यांचा प्रवेश....
अडत दुकान व पाठीमागील गोदामामध्ये एक जिना आहे. यासमोरच एक खिडकी असून चोरट्यांनी बाजूने या खिडकीचे गज कापले आहेत. दोन गज कापून चोरटे आत शिरले. केबिनचा दरवाचा उचकटून आत प्रवेश केला. कटावणीच्या मदतीने तिजोरीचा दरवाजा उखडून आतील रोख ६० लाख रुपये घेऊन चोरटे पसार झाले.
दीड तास चोरट्यांचा वावर...
चोरट्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास दुकानाच्या बाजूच्या खिडकीतून प्रवेश केला. तेथून दुकानात शिरण्यासाठी एक लोखंडी शटर, दरवाजा, केबिनचा दरवाजा अशी तीन कुलपे उचकटली. तेथून केबिनच्या एका कोपऱ्यात असलेल्या तिजोरीकडे जाऊन उचकटण्यास सुरुवात केली. मजबूत तिजोरीचे कुलूप उचकटत नसल्याने अक्षरशः पत्रा उखडून काढत रोकड लुटली. चोरटे सुमारे दीड तास या परिसरात असल्याचे वेगवेगळ्या ठिकाणच्या फुटेजआधारे दिसून आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.