Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...; गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेला दिले प्रत्त्युत्तर

सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...; गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेला दिले प्रत्त्युत्तर
 

इस्लामपूर (जिल्हा सांगली):  'क्या बडा तो सबसे दम बडा' अशा भाषेत आमदार जयंत पाटील यांनी आज येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेला प्रथमच प्रत्त्युत्तर दिले आहे.  'आपलं नाव ऐकलं नाय, असं याक भी गाव नाय, आणि सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...' अशाही शब्दात त्यांनी कडक इशारा यावेळी दिला आहे. 'तुम्हाला राग येतो का?' या प्रश्नावर त्यांना बोलते केल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार यांना लोकांचे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर त्यांनी बाजूला झाले पाहिजे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. महापुराच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. येथील खुल्या नाट्यगृहात आमदार जयंत पाटील यांच्यासोबत दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम झाला. अभिजित करंडे यांनी मुलाखत घेतली. पडळकरांच्या टिकेवर आमदार पाटील म्हणाले, 'माझ्यावर टीका करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी काय समज दिली, त्याचा काय अर्थ घेतला गेला? समजले नाही; पण त्यांचे समर्थन केले गेले हे खटकले. 
माझ्या चौकशीवर ते बोलले. कसलीही चौकशी करा, नुसते बोलू नका. त्यांच्या चुकीच्या भाषेवर, त्याच्या समर्थनासाठी सभा घेतली जाते याचे आश्चर्य आहे. आमच्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. हे जाणीवपूर्वक केले जात्येय. येत्या निवडणुकीत त्याची प्रचिती माझी जनता देईल. मला राग आला आणि तो आपला असेल तर त्याला समजावून सांगतो, पण विरोधक असेल तर दुर्लक्ष करतो.'
ते म्हणाले, 'नुकतेच जिल्ह्यातील एक तरुण भाजपात गेले. त्यांच्या आजोबांचा इतिहास काय? एक आमदारकी मिळण्यासाठी आमची बाजू सोडून गेले. भाजपने कुणाची कसलीही पार्श्वभूमी न पाहता सगळ्यांसाठी दार उघड ठेवले आहे. निवडणूक आयोग अपारदर्शक कामकाज करत आहे. व्होटचोरी झालीच आहे, यात शंकाच नाही.'

सरकारवर टीका करताना ते म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचे कर्ज ९ लाख ५० हजार कोटींवर गेले आहे. येत्या काळात ते आणखी वाढेल. सरकार संकटात आहे. राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर लाखाच्या वर कर्ज आहे. देवस्थान जोडण्याच्या रस्त्यावर १ लाख कोटी खर्च करायला सरकारकडे रक्कम आहे, पण पूरग्रस्तांना मदत द्यायला पैसे नाहीत, ही शोकांतिका आहे.'
अजित पवार यांच्या संबंधांबद्दलच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार हे त्यांच्या पक्षासोबत सत्तेत सहभागी झालेत, पण इतर काही लोक पक्ष सोडून भाजपात जातायत हे पटत नाही. अजित पवार यांच्याबद्दल माझे मत चांगलेच आहे. ते राजकारणात खूप कष्ट करतात, भरपूर कामही करतात. पण निवडणुकीत त्यांनी इथे येऊन टीका केली. राजारामबापू साखर कारखाना दर देत नाही असे ते म्हणाले. एफआरपीनुसार कारखाना दर देतोच. माझ्या निवडणुकीत मी कधीही ऊसदरावर बोलत नाही; कारण सहकारी कारखाना माझी खासगी मालमत्ता नाही. तो विषयच वेगळा आहे. इथे येऊन जे बोलून गेले त्यांचा दर आणि तिथली परिस्थिती वेगळीच आहे.'

ते म्हणाले, 'जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा होत राहतात, त्यावर प्रत्येकवेळी स्पष्टीकरण दिलेच पाहिजे असे काही नाही. ईश्वरपूर नामकरणाला मी विरोध केलाच नाही; पण हे करताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला विचारले असते तर नावात 'उरूण' घालण्याची सूचना केली असती. माझ्या जनतेने मला तळहातावरील जपले आहे.
विधानसभेचा जो निकाल लागला, तो मोकळ्या मनाने मान्य केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा आमचा भाग आहे. त्याच परंपरेतील आम्ही लोक आहोत. नव्या पिढीने आपले मूळ विसरायला नको. हिंदुत्वात शूरपणा हवा. अहंकार आणि दमदाटी नसावी. हिंदुत्वावर मते मागणे भारतात फारकाळ चालणार नाही.'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.