सुधीर गाडगीळांनी 'लेटरबॉम्ब' टाकताच सुरेश खाडे चंद्रकांतदादांच्या मदतीला धावले; मात्र त्यांनी संभ्रमच वाढविला...
सांगलीचे आमदार आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेविरोधात लेटरबॉम्ब टाकल्यानंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. नवे जुने पदाधिकारी असा वाद निर्माण होत असताना मिरजचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीला धावले आहेत.
भाजप पक्षांतर्गत मीटिंगमध्ये बोलण्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाषणात बोलले आहेत. ते खरे की खोटे?, त्यामुळे याबाबत चर्चा नको, असे सांगत खाडे यांनी 'लेटर बॉम्ब'वर स्पष्टीकरण दिले. मात्र, खाडे यांच्या स्पष्टीकरणामुळे विषयाला फुलस्टॉप लागण्याऐवजी संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीची तयारी पक्षीय पातळीवर सुरु झाली आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या भाषणामध्ये २२ जणांना उमेदवारी देण्याबाबत बोलले आहेत. ते पक्षाच्या बैठकीत बोलत नाहीत, ते भाषणात बोलतात. शिवाय भाषणात बोललेले त्यांचे वाक्य किती खरे, किती खोटे मानायचे, हेही आपणाला ठरवायचे आहे. त्यांच्या या वाक्याबाबत स्पष्टता नसल्याने त्यावर चर्चा व्हायला नको. तरीही याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे, असे आमदार सुरेश खाडे यांनी सांगितले.
मिरजेत पत्रकारांशी संवाद साधताना आमदार खाडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, त्या स्पष्टीकरणामुळे चंद्रकांतदादांच्या विश्वासर्हतेवरच प्रश्नचिन्ह उभारले आहे. त्यामुळे 'लेटरबॉम्ब'वरून सुरू झालेले सांगली भाजपमधील नाराजीनाट्य चंद्रकांतदादांच्या खरे खोट्यापर्यंत गेले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी देण्याची घोषणा केल्याची चर्चा काँग्रेस व इतर पक्षातून भाजपत आलेल्या २२ पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये आल्यानंतर समीकरणे बदलली आहेत. त्यांच्याही सहकाऱ्यांना न्याय देण्याच्या भावनेतून पालकमंत्री पाटील, असे म्हणाले असतील. तसेच, त्यांनी बोललेला इच्छुकांचा भागही मिरजेत येत नाही, त्यामुळे मिरजेत याबाबत चर्चेला अर्थ नाही, असा दावा खाडे यांनी केला.
सांगलीबद्दल चंद्रकांतदादांनी कोणाच्याही नावाची घोषणा केलेली नाही. त्यामळे याबाबत नाराजी असण्याचे कारण नाही. भाजपमधील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्त्याना योग्य तो न्याय देण्यात येणार आहे. नव्याने आलेल्या लोकांबद्दल काय निर्णय घ्यायचा ते पालकमंत्री पाटील ठरवतील, असे खाडे यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकीवेळी भाजपचे ४२ नगरसेवक पक्ष चिन्हावर निवडून आले होते. त्याबाबतही पक्षीय पातळीवर विचार होणार आहे. त्यामुळे जुन्या, निष्ठावंताना जाग नाही असे होणार नाही. महायुतीमध्ये उमेदवारीसाठी उत्सुक कार्यर्त्यांची संख्या जास्त असली, तरी याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र ठरवतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज सायंकाळी सहानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुन्हा सांगली दौऱ्यावर येत आहेत. या सांगली दौऱ्यात चंद्रकांत पाटील नेमके या 'लेटर बॉम्ब विरोधात काय प्रतिक्रिया देतात हे पहावे लागणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.