बच्चू कडूंचा महाएल्गार हायकोर्टाने गुंडाळला; फडणवीस सरकारकडून जरांगे पाटील आंदोलनाचा पॅटर्न रिपीट?
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार त्यांनी केला आहे.
यामुळे मंगळवारपासून नागपूर जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे. शेकडो वाहने अडकून पडली आहेत.
अखेर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याची तातडीने दखल घेऊन आजच सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे नागरिकांना दिलास मिळणार असला तरी कडू यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना कडू यांनी अद्याप आपल्याला न्यायालयाचा आदेश मिळाला नाही, असे सांगितले आहे.
या आंदोलनाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीची दखल स्वतःहून उच्च न्यायालयाने घेतली. जनहित याचिका दाखल करून दिवाळीच्या सुट्या असतानाही तातडीने सुनावणी केली. न्यायालयाच्या आदेशात सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्यास बच्चू कडू यांना बजावण्यात आले आहे.
या आदेशाची प्रत कडू यांना प्रत्यक्ष, ईमेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास सांगण्यात आले आहे. या आदेशाच्या पालनाचा अहवाल गुरुवारी (ता.३०) सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने नागपूर पोलिसांना दिले आहे. आता यावर कडू काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बच्चू कडू यांच्या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले आहेत. सुमारे ५०० ट्रॅक्टर घेऊन कडू स्वतः आले आहेत. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच वाहतूत कोंडीला सुरुवात झाली आहे. रात्री अनेकांना या आंदोलनामुळे पाच ते सहा तास अडकून पडावे लागले होते. आंदोलकांनी पर्याय मार्गावरही टायरची जाळपोळ केली. समृद्धी महामार्गावरचीसुद्धा वाहतूक रोखली होती. याशिवाय रेल्वे रोखण्याचाही इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पॅटर्न रिपीट केला?
यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलकांना फडणवीस सरकारने कुठेही मज्जाव केला नव्हता. मुंबई जाम झाली तरी कुठल्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नव्हते. अर्थात त्यामुळे आंदोलन चिघळण्याचाही धोका होता. पण शेवटी उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे नागपूरमध्येही फडणवीस सरकारने कुठेही आंदोलकांना हटकले नाही. मागील दोन दिवसांमध्ये आंदोलकांनी नागपूर शहर जाम केले आहे. 4 महामार्ग बंद पाडले. यावर नागपर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून मोर्चास्थळ 6 वाजेपर्यंत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांचे आंदोलन हाताळतानाही जरांगे पाटील आंदोलनाचा पॅटर्न रिपीट केल्याचे बोलले जाते आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.