दीपोत्सव आबाल वृद्धांना प्रिय! दिवाळीची वाट बघत तयारी करा, फराळ तयार करा, घराची सजावट करा, रांगोळी, दिवे, पणत्या लावून रोषणाई करा, यात सणाचे पाच दिवस भुर्रकन उडून जातात, पण या दिवसांत तयार झालेल्या आठवणी वर्षभर पुरतात. अशातच लक्ष्मीपूजन करून आपण वर्षभर आर्थिक वृद्धीची तजवीज करतो. मात्र सोशल मीडियावर माहितीचा महापूर आल्याने योग्य दिवस कोणता हा गोंधळ अजूनही अनेकांच्या मनात आहे. तो दूर व्हावा म्हणून ही शास्त्रोक्त माहिती जाणून घ्या.
दिवाळीचा महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजेचा अर्थात अश्विन अमावस्येचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी, वास्तूसाठी सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मी पूजे संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.२० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३. ४४ मिनिटांनी अमावस्या तिथी सुरु होणार आहे, तर २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.५४ मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होणार आहे. ही तिथी सोमवारी सुरु होत असल्याने सोमवती अमावस्या(Somvati Amavasya 2025) म्हटली जाईल. मात्र लक्ष्मी पूजेचे नियम पुढीलप्रमाणे असतील.
लक्ष्मी पूजन तारीख आणि मुहूर्त
२० ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळात अमावस्या सुरु होत आहे, त्यामुळे ही तिथी प्रदोषव्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहारापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे. म्हणून मंगळवारी २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे.
प्रदोष काळात पूजा अमान्य :
२० ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे, याउलट २१ तारखेला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मीपूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले आहे. प्रदोष काळ भगवान शंकराच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. या वेळेत पूजा केल्यास त्याचे महत्त्व हजारपट वाढते. तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मी पूजेला महत्त्व दिले जाते म्हणून प्रदोष काळात लक्ष्मी पूजन करणे योग्य ठरणार नाही. सोम प्रदोष( 2025) काळ हा मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करतो, तर लक्ष्मी पूजन भौतिक सुख-समृद्धी मिळवण्यासाठी केले जाते. त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेत फरक ठेवला जातो.
लक्ष्मी पूजनासाठी 'स्थिरता' आवश्यक :
स्थिर लग्न: स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग. देवी लक्ष्मीची पूजा अशाच स्थिर मुहूर्तावर केली जाते, जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी. प्रदोषकाळ हा अस्थिर किंवा दोन काळांच्या (दिवस आणि रात्र) संधीकाळातील मानला जातो, जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही.
कर्मकांडात निश्चित वेळेचे महत्त्व :
धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो. लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो, तो प्रदोषकाळात पूर्ण होत नाही. त्यामुळे, लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोषकाळानंतर, स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.