Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :- १२ कोटी ३५ लाखांची फसवणूक! बाळूमामांच्या दरबारात पाया पडायला आला अन्, पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकला...

कोल्हापूर :- १२ कोटी ३५ लाखांची फसवणूक! बाळूमामांच्या दरबारात पाया पडायला आला अन्, पोलिसांच्या सापळ्यात बरोबर अडकला...
 

फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दीड महिन्यात रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल ₹12.35 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

मुख्य आरोपी अटक, मुलगा आधीच तुरुंगात:

मुख्य आरोपी राजेंद्र भीमराव नेर्लीकर (रा. हुपरी) वर्षभर फरार राहिल्यानंतर अखेर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केली; त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर आधीच कारागृहात आहे.
 
 
गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक आणि सामाजिक विश्वासाचा गैरवापर:

नेर्लीकरने एका मुनी महाराजांचा विश्वास जिंकून त्यांच्या माध्यमातून भक्त, निवृत्त सैनिक, शासकीय अधिकारी, गृहिणी आदींना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दीड महिन्यांत रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल १२ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक करून वर्षभर फरार असलेल्या येथील राजेंद्र भीमराव नेर्लीकर (रा. शिवाजीनगर, हुपरी) या ठकसेनाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज मुसक्या आवळल्या. या प्रकरणातील दुसरा आरोपी त्याचा मुलगा बालाजी राजेंद्र नेर्लीकर वर्षभरापासून कारागृहात आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेर्लीकर याने फॉरेक्स ट्रेडिंगसारख्या विविध गुंतवणूक कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक रकमेवर अल्पकालावधीत जादा परतावा देण्याचे तसेच दीड महिन्यांत रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. त्यास भुलून अनेकांनी रक्कम गुंतवली. सुरुवातीला काही जणांना सांगितल्याप्रमाणे रकमा मिळाल्या. त्यामुळे जादा पैसे मिळतील या आशेने शेकडो जणांची त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी रांग लागली. मात्र, हेतू साध्य होताच कंपनीचा गाशा गुंडाळून नेर्लीकर फरार झाला. त्यामुळे हवालदिल झालेल्या निवृत्त सैनिक विनायक पाटील (रा. कसबा वाळवा, ता. राधानगरी) यांच्यासह अनेक गुंतवणूकदारांनी उत्तूर, हुपरी तसेच अन्य पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या. 
 
पोलिसांनी नेर्लीकरचा मुलगा बालाजी यास त्याचवेळी अटक केली. बालाजी अद्यापही तुरुंगात आहे. मात्र, नेर्लीकर कायद्यातील पळवाटा शोधत वर्षभर फरार होता. दरम्यान, तो आदमापूर येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हवालदार विजय काळे यांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश इंगळे हवालदार विजय काळे, राहुल गायकवाड, रवींद्र गायकवाड, कॉन्स्टेबल विपुल माळी, चालक सुनील गावडे यांच्या पथकाने नेर्लीकर यास आदमापूर येथील हॉटेल त्रिशा येथून ताब्यात घेतले. नेर्लीकर यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीच्या तक्रारी

लाघवी बोलण्याने नेर्लीकरने उत्तूर येथील एका मुनी महाराजांचा विश्वास संपादन केला. त्याच्या बोलण्यास महाराजही भुलले. त्यांनी आपल्या भक्त संप्रदायास नेर्लीकरकडे गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. महाराजांवर विश्वास ठेवून निवृत्त सैनिक, शासकीय अधिकारी, नोकरदार, शिक्षक, गृहिणी, व्यापारी, सामान्य आदी लोकांनी आपले पैसे गुंतविले. मात्र, फसल्याचे लक्षात येताच गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नेर्लीकरच्या येथील निवासस्थानी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी राजकीय मध्यस्थीनंतर पैसे परत करण्याचे दिलेले आश्वासन न पाळता तो फरार होता. नेर्लीकरच्‍या विरोधात आंध्र प्रदेश तसेच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीच्या तक्रारी दाखल आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.