पिस्तूल तस्करी करणाऱ्या बामणोलीच्या दोघांना अटक, ५ गावठी पिस्तुलांसह १२ काडतुसे जप्त:, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : मध्य प्रदेशातून पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या मलिक सलीम शेख (वय २५, रा. दत्तनगर, बामणोली), प्रथमेश ऊर्फ पाट्या सुरेश पाटोळे (वय २२, रा. झील स्कूलच्या पाठीमागे, बामणोली, ता.मिरज) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरजेतून अटक केली. त्यांच्याकडून ५ देशी बनावटीची पिस्तुले, १२ काडतुसे असा ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिस्तुले पुरवणाऱ्या राजेंद्रसिंग ऊर्फ गोलूसिंग बडवाणीसिंग टकराना (रा. उमरटी, जि. बडवाणी) याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हे अन्वेषणचे एक पथक अवैध अग्निशस्त्रविरोधात कारवाईसाठी स्थापन केले आहे. सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल ऐनापुरे यांना मिरजेतील रमा उद्यान कॉलनीत ऑक्सिजन पार्कमध्ये दोघेजण पिस्तुले विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. संशयित दोघेजण त्याठिकाणी आल्यानंतर पथकाने ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी मलिक शेख व प्रथमेश पाटोळे अशी नावे सांगितली. मलिक शेखच्या पाठीवर असलेल्या सॅकची झडती घेतली असता त्यात देशी बनावटीची पाच गावठी पिस्तुले आणि १२ जिवंत काडतुसे मिळून आली. दोघांकडे पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशात जाऊन राजेंद्रसिंग टकराना याच्याकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. दोघांकडून पिस्तुले व काडतुसे जप्त करून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस हवालदार आमसिद्ध खोत यांनी दोघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सावंत, मिरज शहरचे सहायक निरीक्षक दत्तात्रय पुजारी, गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील, अंमलदार अमोल ऐदाळे, बसवराज शिरगुप्पी, बाबासाहेब माने, इम्रान मुल्ला, संकेत मगदूम, सुशील मस्के, शिवाजी शिद, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, गणेश शिंदे, अभिजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
मलिक शेख वाँटेड गुन्हेगार
मलिक शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टचे दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांत तो 'वाँटेड' होता.
राजेंद्रसिंगचा पोलिसांना चकवा
मलिक शेख व प्रथमेश पाटोळेला अटक करून पोलिस कोठडीत दोघांची कसून चौकशी केल्यानंतर राजेंद्रसिंगला पकडण्यासाठी पोलिस पथक मध्य प्रदेशात गेले. परंतु तो मिळून आला नाही. त्याने पोलिसांना चकवा दिला असून, पथक त्याच्या मागावर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.