Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं

"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
 

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा ग्रुपमध्ये  सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांवर दिवंगत रतन टाटांचे निकटवर्तीय मानले जाणारे नोशीर सूनावाला यांनी आपलं मौन सोडलं आहे. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये बहुतांश भागिदारी असलेल्या टाटा ट्रस्ट्समध्ये अलीकडेच अनेक मतभेदाच्या बातम्या समोर आल्या आहेत. यात नंतर सरकारलाही त्यात हस्तक्षेप करावा लागला आहे. अलीकडेच टाटा ग्रुपच्या काही अधिकाऱ्यांनी दिल्लीतील दोन वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली होती. रतन टाटा यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालं होतं.

सूनावाला हे टाटा सन्सचे उपाध्यक्ष आणि टाटा ट्रस्ट्सचे विश्वस्त राहिले आहेत. नोशीर सूनावाला यांनी यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियासोबत संवाद साधला. "टाटा समूहामध्ये जे काही घडत आहे, ते पाहून दुःख होतं, कारण मी माझं जवळजवळ संपूर्ण करिअर याच समूहाला समर्पित केलंय. मला आशा आहे की टाटा ट्रस्ट्सचे विश्वस्त त्यांचे प्रश्न सोडवतील," असं सूनावाला म्हणाले. सूनावाला हे केवळ रतन टाटांचेच नव्हे, तर त्यांचे धाकटे सावत्र भाऊ आणि सध्याचे टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आणि नोएल यांच्या आई सिमोन टाटा यांचेही निकटवर्तीय मानले जात होते.

नेमका मुद्दा काय?
आता आपण टाटा समूहामध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेरून पाहत आहोत. ते नेहमीच नोएल टाटा यांना रतन टाटांनंतर टाटा सन्सचे उत्तराधिकारी बनवण्याच्या बाजूने होते, पण हे पद आधी नोएल यांचे दिवंगत मेहुणे सायरस मिस्त्री यांना आणि नंतर टीसीएसचे कार्यकारी एन चंद्रशेखरन यांना मिळालं, असं ते म्हणाले. सूनावाला यांना विचारले असता की, ते वादग्रस्त विश्वस्तांमध्ये मध्यस्थी करतील का, तेव्हा ते म्हणाले, "मी आता एक बाहेरील व्यक्ती आहे. मी अनेक वर्षांपूर्वी माझ्या भूमिकेचा राजीनामा दिला आहे. मी वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या मतभेदांबद्दल वाचतो. खरा मुद्दा काय आहे? हा १५७ वर्ष जुना समूह आहे."

११ आणि १७ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या टाटा ट्रस्ट्सच्या बैठकांमध्ये सूनावाला हे आमंत्रित केलेले एकमेव दिग्गज होते. रतन टाटा यांच्या ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधनानंतर या बैठकांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ११ ऑक्टोबरच्या बैठकीत मेहली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्तांनी नोएल टाटा यांची चॅरिटीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सूनावाला यांनी सांगितले की, बैठकीत विश्वस्तांचा कार्यकाळ आजीवन वाढवण्यावरही चर्चा झाली होती.
नेमका कशावरून सुरू आहे वाद?

१७ ऑक्टोबरच्या बैठकीत नोएल टाटा यांची चॅरिटीजतर्फे टाटा सन्सच्या बोर्डात नॉमिनी डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नॉमिनी डायरेक्टर्सची वार्षिक समीक्षा केली जाईल, हे देखील निश्चित करण्यात आलं. याच निर्णयामुळे ११ सप्टेंबर २०२५ च्या बैठकीत विश्वस्तांमध्ये मतभेद निर्माण झाले, जेव्हा बहुमताने टाटा सन्सच्या बोर्डातील ट्रस्टचे नॉमिनी डायरेक्टर विजय सिंह यांच्या पुन्हा नियुक्तीविरुद्ध मतदान केलं. ७७ वर्षीय सिंह यांनी यानंतर टाटा सन्सकडून राजीनामा दिला.

१९६८ मध्ये समूहात सामील
सूनावाला १९६८ मध्ये टाटा ग्रुपमध्ये सामील झाले होते. त्यांनी टाटा सन्सच्या काही महत्त्वाच्या निधी उभारणीच्या कामांना मूर्त रूप दिलं होतं. यामध्ये १९९५ चा ३०० कोटी रुपयांचा राइट्स इश्यू समाविष्ट होता, ज्यामुळे लिस्टेड टाटा ग्रुप कंपन्यांना टाटा सन्समध्ये भागिदारी खरेदी करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर झालेल्या डिबेंचर इश्यूनं ग्रुपची आर्थिक स्थिती आणि होल्डिंग्स मजबूत केली. ते २०१० मध्ये टाटा सन्समधून निवृत्त झाले आणि त्यांनी २०१९ मध्ये टाटा ट्रस्ट्समधून राजीनामा दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.