Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रवींद्र धंगेकरांची पुन्हा नवी पोस्ट,पुण्यात खळबळ ; म्हणाले,'तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि...'

रवींद्र धंगेकरांची पुन्हा नवी पोस्ट,पुण्यात खळबळ ; म्हणाले,'तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि...'
 

राज्याच्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र नांदत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुण्याचे महानगरप्रमुख माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी राजकारणच बदललं आहे. गेल्या काही दिवसांपासून धंगेकरांनी भाजप नेत्यांनाच टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या एकापाठोपाठ एक अशा गंभीर आरोपांमुळे पुण्यातील महायुतीही धोक्यात आली आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र धंगेकरांवर  कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.अशातच आता धंगेकरांनी नवी पोस्ट केली आहे.

माजी आमदार आणि शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी बुधवारी(ता.22) सोशल मीडियावरील एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचं म्हटलं आहे.तसेच आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील,असा मला विश्वास असल्याचंही धंगेकरांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

धंगेकर पुढे म्हणतात,तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही.सोबत आहेत पुणेकर,लढत राहील धंगेकर..!असंही लढवय्या बाणा त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकरांच्या काही गंभीर आरोपांमुळे भाजपच्या गोटात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. एवढंच नव्हे तर चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यावरही शाब्दिक हल्ला चढवल्यानंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी तर थेट धंगेकरांना ठोकून काढू अशीच टोकाचीच भाषा वापरली होती. 
 
पुण्यातील भाजप  काही नेत्यांनी धंगेकरांची तक्रार केल्याच्याही चर्चा सुरु आहेत.याच दरम्यान धंगेकरांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली लढाई यापुढेही चालूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. याचवेळी रविंद्र धंगेकर यांनी पुण्यातील सर्वपक्षीयांना समाजात कुठलीही चुकीची घटना घडत असताना जर ती आपल्या निदर्शनास आली तर एक जागृत पुणेकर म्हणून त्या घटनेवर व्यक्त होण्याचं आवाहन केलं आहे.धंगेकरांनी सायलेंट मोडमधून बाहेर पडल्यानंतर विरोधकांऐवजी थेट महायुतीच्याच नेत्यांवर टीकेची झोड उठवल्यामुळे पुण्याचं राजकारण तापलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते.त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या रविंद्र धंगेकरांकडून होत असलेल्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला होता.तेव्हा फडणवीसांनी धंगेकरांबाबत त्यांच्या बॉसशी बोलेन असं म्हणत अधिकचं भाष्य टाळलं होतं. पण त्यानंतरही धंगेकरांनी आपली तलवार म्यान न करता उलट टोकदार आणि धारदार बनवली असल्याचंच पाहायला मिळत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.