Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :-'खुशाल' जगण्याचा हव्यास, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर रेड; मूळ संपत्तीपेक्षा ७६ टक्के संपत्ती कमावली

कोल्हापूर :-'खुशाल' जगण्याचा हव्यास, निवृत्त अधिकाऱ्याच्या घरावर रेड; मूळ संपत्तीपेक्षा ७६ टक्के संपत्ती कमावली

भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल: भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचे तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे आणि पत्नी हेमांगी सपकाळे यांच्या विरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

७६ टक्के अपसंपदा उघड: सपकाळे दांपत्याच्या नावे ज्ञात उत्पन्नापेक्षा एक कोटी ६६ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न.

राज्यभर मालमत्ता आढळली: मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जमीन, घर, फ्लॅट आणि मोटारींची नोंद; घराची झडती सुरू असून तपास पुणे परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले करीत आहेत.

कोल्हापूर:- भारत राखीव बटालियन क्रमांक तीनचे तत्कालीन समादेशक खुशाल विठ्ठल सपकाळे (वय ६०, रा. मरोशी भवानीनगर, मरोळ, मुंबई) यांच्यासह पत्नी हेमांगी सपकाळे यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी आज गुन्हा दाखल झाला. सपकाळ दांपत्याच्या नावे ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा एक कोटी ६६ लाख ११ हजार रुपयांची म्हणजेच ७६ टक्के अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत २०१८ मध्ये लाचप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतरच त्यांची चौकशी सुरू झाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः
 सपकाळे २०१७ -१८ मध्ये समादेशक म्हणून कोल्हापुरात कार्यरत होते. गट मुख्यालय येथे क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना आहार, भत्ता नियमित वाटप करण्यासाठी सोसायटीकडून एक लाखाचे कर्ज एका जवानाला हवे होते. कर्ज मंजुरीसाठी ४० हजारांची लाच घेतल्याचे प्रकरण जुलै २०१८ मध्ये उघडकीस आले होते.

यामध्ये मधुकर सकट, मनोहर गवळी, राजकुमार जाधव, रमेश शिरगुप्पे, आनंदा फौजदार, प्रवीण कोळी अशांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. चौकशीत जवानाने खासगी व्यक्तीकडून घेतलेली रक्कम तत्कालीन समादेशक सपकाळे यांच्या खात्यावर जमा केल्याचे समोर आल्याने त्यांनाही अटक झाली होती.

संशयितांच्या मालमत्तेची चौकशी....

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सपकाळेसह इतरांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली होती. सपकाळे यांच्या १ मार्च १९८३ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या सेवा कालावधीतील मालमत्तेची चौकशी झाली. त्यांच्यासह पत्नी हेमांगी यांच्या नावे उत्पन्नाच्या ७६ टक्के अधिक म्हणजे एक कोटी ६६ लाख ३३ हजार रुपयांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. ही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पूर्ण केली. यानंतर आज त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

घराची झडती

याप्रकरणी त्यांच्यासह पत्नी हेमांगी यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३ (१), (ई) सह १३ (२) व भारतीय दंड संहिता कलम १०९ प्रमाणे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या घराच्या झडतीही सुरू करण्यात आली आहे. पुणे परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले तपास करीत आहेत.

संशयित सपकाळे व हेमांगी सपकाळे यांच्या नावे मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जमीन, घरे, फ्लॅट अशा मालमत्ता आढळून आल्या. तसेच मोटारींचीही नोंद करण्यात आली आहे. याची चौकशी करून पुणे कार्यालयातील वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. लाच प्रकरणातील इतरांचीही चौकशी सुरू असल्याचे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले.

अपसंपदेच्या चार गुन्ह्यांचा तपास सुरू....

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चार अपसंपदा प्रकरणांची चौकशी सुरू आहे, तर २०२२ नंतर अशाप्रकारचा पहिला गुन्हा दाखल झाला. मागील तीन वर्षांत अशाप्रकारची एकही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.