उमेदवारांना १३ लाखांतच करावा लागणार प्रचार ; राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी
राज्य निवडणूक आयोगाने आगामी नियोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवाराने प्रचारासाठी करावयाच्या खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे.
याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश 'ब' वर्ग महापालिकेत असून, या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात महानगरपालिका सदस्य, नगरपरिषद / नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिका आणि 'अ' वर्गामध्ये येणाऱ्या पुणे व नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
तर 'ब' वर्गामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवड, नाशिक व ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय 'क' वर्गामध्ये येणाऱ्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर व वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ११ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली असून, 'ड' वर्गामध्ये येणाऱ्या उर्वरित १९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ९ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भावी नगरसेवकांना खर्च करताना विचार करावा लागणार आहे.
करावी लागणार तारेवरची कसरत..
यंदाही २०१७ सालची प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे. मतदारसंख्या आणि प्रभागाचा विस्तार पाहता मिनी विधानसभा मतदारसंघासारखा आहे. अनेक लहान राज्यांच्या विधानसभा मतदारसंख्येइतकी मतदारसंख्या शहरातील काही प्रभागांमध्ये आहे. सरासरी ४० हजार मतदारसंख्या असलेल्या प्रभागात १३ लाखांत प्रचार खर्च आटोपणे जिकरीचे ठरणार आहे. प्रचार साहित्य प्रसिद्धी, कोपरा सभा, कार्यकत्र्यांची जेवणावळी, इंधनखर्च या सर्वांचा मेळ बसविताना उमेदवारांची तारेवरची कसरत होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.