आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या खिशात खोट्या चिठ्ठ्या? लातूरमध्ये तीन प्रकरणांत नातेवाईकांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या तीन आत्महत्यांच्या प्रकरणांत, मृत व्यक्तींच्या खिशात आत्महत्येचे कारण सांगणाऱ्या चिठ्ठ्या दुसर्याच कोणी तरी ठेवल्या असल्याचा प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे.
विशेष म्हणजे या तिन्ही चिठ्ठया अनुक्रमे मराठा, महादेव काेळी आणि बंजारा अशा तिन्ही जातीतील आत्महत्या केलेल्या व्यक्तींजवळ ठेवण्यात आल्या होत्या. या तिन्ही प्रकरणांमध्ये नंतर चिठ्ठया ठेवणारे काेण होते हे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच गुन्हा असावा.
आत्महत्येच्या घटनांचा वापर करून काहींनी सामाजिक आणि राजकीय दबाव निर्माण करण्याचा तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न होता काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.अहमदपूर तालुका शिंदगी येथे २६ ऑगस्ट रोजी बळीराम श्रीपती मुळे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर त्यांचा जीव वाचला. तपासात समोर आले की, त्यांच्या चुलत भावाने “मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे” अशी चिठ्ठी त्यांच्या खिशात ठेवली होती.
तसेच निलंगा तालुक्यतील दादगी येथे शिवाजी मेळे यांचा विजेच्या शेगडीला करंट लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशात "महादेव कोळी समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली" अशी चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी त्यांच्या नातेवाईकांनी नंतर ठेवली असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच चाकूर तालुक्यातील अनिल राठोड यांनी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात "बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या" केल्याची चिठ्ठी आढळली. तपासात ती चिठ्ठी बनावट असल्याचे उघड झाले असून, त्यांच्या तीन नातेवाईकांनी ती ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि खोटी माहिती देण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही आत्महत्यांची कारणे काय होती, याचा तपास स्वतंत्रपणे केला जात असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगीतले. ते म्हणाले, झालेल्या आत्महत्या आणि पुढे येणारे कारण यात संशयाला जागा होती.
म्हणून या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचे हस्ताक्षर नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल आल्यानंतर आत्महत्यांपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठया त्या व्यक्तीच्या नव्हत्याच हे स्पष्ट झाले. त्यानंतर पुन्हा चौकशी केली. या चिठ्ठया कोणी व कशा ठेवल्या हे तपासात स्पष्ट झाल्यानंतर तिन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.