महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट, मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार, मंत्रिमंडळात फेरबदल होणार?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीमधील सर्व मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार असल्याची चर्चा आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. मंत्र्यांच्या कामांच्या ऑडिटमधून कोणत्या मंत्र्याने काय-काय कामे केली, याची माहिती घेतली जाणार आहे. असं असलं तरी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना याबाबतच्या वृत्तांचं खंडन केलं आहे. मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होईल म्हणजे केवळ मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. तूर्तास तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही विचार नाही. याउलट सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे विस्तार होईल किंवा सध्याच्या मंत्र्यांना हटवण्याबाबत कोणतीही परिस्थिती नाही. आमच्यासाठी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची कोणतीही शक्यता नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत एकत्र लढणार, फडणवीस यांचं वक्तव्य
दरम्यान, "आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण "पुणे, पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार", असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच "ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का? याची चाचपणी होईल. विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे महायुती म्हणून एकत्र लढू", असंही फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, ठाण्यात एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.दुसरीकडे महायुतीत अनेक ठिकाणी मतभेद पहायला मिळत आहेत. हे मतभेद पाहता आगामी निवडणुकीला महायुतीचे नेते कसे सामोरे जातात? ते पाहणं देखील महत्त्वाचे आहे. स्थानिक पातळीवर सुरु असलेले मतभेद हे टोकाला जाऊ नयेत, यासाठी महायुतीच्या घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते काय-काय पावलं उचलतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.