Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषदेसाठी कायपण! 'सरकार', ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार 'कुणबी'; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

जिल्हा परिषदेसाठी कायपण! 'सरकार', ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार 'कुणबी'; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले
 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'सरकार' व '९६ कुळी मराठा' सांगणारे अनेक जण आता 'कुणबी' दाखले काढत आहेत, कारण 'कुणबी' ही जात ओबीसी प्रवर्गात येते आणि या प्रवर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळतो.

 
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'कुणबी' दाखले:

ओबीसी महिलांसाठी आरक्षित गटांमध्ये संधी साधण्यासाठी काही इच्छुकांनी स्वतःसह पत्नींचेही 'कुणबी' दाखले मिळवले आहेत, तर अनेकांनी आरक्षण निश्‍चितीनंतर अर्ज सादर करण्याची तयारी केली आहे.

पैसा ठरवणार उमेदवारीचा निकष:

आर्थिक ताकद असलेलेच उमेदवारीसाठी दावेदार ठरणार, असा कल दिसतो आहे. 'खरे' ओबीसी उमेदवार मागे पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक जीवनात, कुटुंबातील सदस्यांचे लग्न ठरवताना आम्ही 'सरकार', '९६ कुळी' सांगणारे अनेक जण आता जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी 'कुणबी' होणार आहेत. गट, गणांवर आरक्षण काहीही पडू देत पण लढायचेच, असे ठरवलेल्या काहींनी यापूर्वीच 'कुणबी'चे दाखले काढले आहेत, तर आरक्षण निश्‍चितीनंतर ज्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालेल्या ठिकाणी संधी हुकलेल्यांनी स्वतःच्या सौभाग्यवतींचे दाखल काढण्यास सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ गटांपैकी १८ गट हे ओबीसीसाठी राखीव राहिले आहेत. या १८ पैकी ९ गट सोडत पद्धतीने त्याच प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहिले आहेत. अलीकडेचे मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर महसूल पुरावा असलेल्या व नोंदी सापडलेल्या लोकांना 'कुणबी'चे दाखले देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानंतर अनेकांनी हे दाखले काढले. काहींना त्याचा मुलांच्या शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी उपयोग केला. पण 'कुणबी' ही जात नागरिकांचा मागास प्रवर्गात (ओबीसी) येते. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसीसाठी स्वतंत्र आरक्षण आहे, त्यात अशा 'कुणबी'चाच भरणा यापूर्वीही झालेला आहे.

 

पूर्वी सहकारी संस्थात अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असे एक पद राखीव होते. या पदासाठी अनेक सरकार लोकांनी कमी उत्पन्नाचे दाखले काढून या संधीचा लाभ घेतला. त्याच धर्तीवर आता 'कुणबी' दाखले काढून जिल्हा परिषदेच्या मैदानात शड्डू ठोकण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. विशेषतः सार्वजनिक जीवनात आपण 'सरकार' आहोत, '९६ कुळी' मराठा आहोत, असे सांगणारेच यात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. कागलमधील एका इच्छुकांच्या पत्नीचे सोशल मीडियावर झळकलेली सलामी हा त्याचाच एक भाग आहे.

राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज व करवीरच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत. त्या आधारावर ग्रामीण भागांसह शहरातही मराठा समजल्या जाणाऱ्या काही दिग्गजांना केवळ निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून स्वतःसह पत्नीचा 'कुणबी'चा दाखला मिळवला आहे. सर्वसामान्यांना हा दाखला मिळविताना प्रचंड त्रास होत असताना यापैकी काही नावे वाचली तर हे 'कुणबी' कसे? असा प्रश्‍न पडतो, पण त्यांना विनासायास असे दाखले मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांची पोलखोल आता प्रत्यक्ष ओबीसीतून अर्ज भरलेल्यांची नावे निश्‍चित झाल्यानंतर होईल.

 
आर्थिक ताकद हाच निकष

ओबीसीतून खरा ओबीसी असलेल्या व्‍यक्‍तीला उमेदवारी मिळेल की नाही, याविषयी मोठी संभ्रमावस्था आहे. पण, ज्यांच्याकडे पैसा तोच उमेदवारीचा प्रबळ दावेदार हाच निकष सर्वच पक्षांत असणार आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गही त्याला अपवाद राहणार नाही. अनेकांना आपले दाखले तयार ठेवले आहेत. नेत्यांनी विचारले की दाखला दाखवायचा आणि उमेदवारी मिळवायची, असा चंग बांधला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे दाखले आहेत, ते सध्‍या शांत दिसत असले तरी ऐनवेळी तेच उमेदवार असतील यात शंका नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.