विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना
भिशीच्या नावाखाली फसवणूक: राजेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीचे चेअरमन भिकाजी शिंदे व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी ४० महिलांची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केली. जादा व्याजदराचे आमिष: १५% परताव्याचे आमिष दाखवून महिलांकडून रक्कम उभी केली; परंतु पैसे परत न करता दांपत्याने पोबारा केला. गुन्हा दाखल: आर्थिक गुन्हे शाखेच्या
तपासानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला; ४० हून अधिक
महिलांचे जबाब नोंदवले. जादा व्याजदराच्या आमिषाने राजेंद्रनगरातील ४०
महिलांची २५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी
पोलिसांनी भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. म्हाडा कॉलनी,
राजेंद्रनगर) या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत राजन आप्पासाहेब
थोरवत यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.भिशीच्या नावाने
जमवलेली रक्कम घेऊन दांपत्याने पोबारा केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः
भिकाजी शिंदे राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीचा चेअरमन म्हणून वावरत होता.
अनेकांसोबतच्या ओळखीतून त्याने मासिक भिशी सुरू केली होती. त्याने २०२०
मध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून एक ते २० हजारांपर्यंतची रक्कम स्वीकारली.
पुढील चार वर्षे अनेक महिलांकडून या दांपत्याने रक्कम स्वीकारली; पण पैसे
परत केले नव्हते.
पोलिसांत धाव...
भागातील ४० हून अधिक महिलांनी गुंतवलेल्या पैशांबाबत तगादा सुरू केला होता; पण शिंदे याने पैसे देण्यास असमर्थता दाखविल्याने महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची दखल पोलिस अधीक्षकांनी घेऊन याचा तपास करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. या अर्जाचा तपास करून गुन्हा दाखल करण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडे पाठविण्यात आला. याप्रकरणात ४० हून अधिक महिलांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत.
निवृत्ती वेतनाची रक्कम गुंतवली....
फिर्यादी पाटील यांचे पती एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेत. त्यांची निवृत्त वेतनाची रक्कम आली होती. शिंदेने एका जमीन खरेदीत पैसे लागणार असल्याचे सांगून पाटील यांच्या फंडाची १० लाखांची रक्कम घेतली. ही सर्वच रक्कम फसवणुकीमुळे अडकली आहे. शिंदे याने गोळा केलेल्या एकरकमी पैशावर १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवले होते. दरमहा गुंतवणूक केल्यास हा दर १० टक्के होता. यामुळे एकरकमी गुंतवणुकीकडे कल अधिक होता. यातून सुमारे २५ लाख रुपये गोळा करून दोघेही पसार झाले आहेत.
म्हाडा कॉलनीचा 'चेअरमन'
म्हाडा कॉलनीचा चेअरमन म्हणून भिकाजी शिंदेचा रुबाब होता. त्याने रहिवाशांचा विश्वास संपादन करून भिशी गोळा केली होती. याबाबत 'दैनिक सकाळ'ने चेअरमनकडून फसवणूक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. यानंतर पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांनी या तक्रांरीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. यानंतर अखेर चेअरमनविरोधात गुन्हा दाखल झाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.