Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयसिंगपूर हादरलं! मुलाच्या वाढदिवसाची पार्टी पित्यासाठी ठरली अखेरची; पार्टीत दगडाने ठेचून मित्रांकडून खून

जयसिंगपूर हादरलं! मुलाच्या वाढदिवसाची पार्टी पित्यासाठी ठरली अखेरची; पार्टीत दगडाने ठेचून मित्रांकडून खून
 

जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या जॅकवेलजवळ लखन सुरेश घावट ऊर्फ बागडी (वय ३५, रा. मच्छी मार्केट परिसर, जयसिंगपूर) याचा डोके दगडाने ठेचून निर्घृण खून  केल्याची घटना रविवारी (ता.२६) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेने जयसिंगपूर व उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आठवड्यात शहरातील दोघांच्या खुनामुळे खळबळ उडाली आहे.

लखन बागडीच्या खूनप्रकरणी अक्षय माने, संकेत हंबर, अमीन राजपूत, अमित सांगावकर, प्रथमेश ऊर्फ गोट्या पवार, अरविंद माळी (सर्व रा. जयसिंगपूर) यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. अन्य दोघांच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. याबाबतची फिर्याद योगेश सुरेश घावट यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.

लखन घावट यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ते पाच मित्रांसोबत कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या उदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलजवळ गेले होते. पार्टी दरम्यान, किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि त्यात एका साथीदाराने लखनच्या डोक्यावर दगडाने प्रहार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 
 
घटनेची माहिती मिळताच उदगाव येथे जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पथकाने धाव घेतली व घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आठवड्यात शहरातील दोघांच्या खुनाच्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले असून, यंत्रणेसमोर आव्हान निर्माण केले आहे. 

नदीकाठी स्मशान शांतता

रविवार असल्याने सकाळपासून नदीत पोहण्यासाठी गर्दी होती. दुपारी खुनाच्या घटनेने नदीकाठी स्मशान शांतता निर्माण झाली.

खुनाचे सत्र

आठवड्यात शहरातील दोघांच्या खुनाच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस यंत्रणेने यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.