संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?
सोलापूर : येथील एका नामांकित बँकेतील महिला अधिकाऱ्यास लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आदित्यकुमार श्रीइंद्रदेव झा (रा.सोलापूर) या संशयिताची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. केवळ लग्नास नकार दिल्याने पूर्णतः संमतीने झालेले शारीरिक संबंध बलात्काराच्या व्याख्येत येत नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून हा निकाल दिला.
सोलापुरातील एका बँकेतील अविवाहित पीडिता व आदित्यकुमार झा यांच्यात २०१४ मध्ये पुणे येथील प्रशिक्षणावेळी ओळख झाली होती. सोलापुरात आल्यावर २६ जानेवारी २०१५ रोजी आदित्यकुमारने लग्नाच्या आमिषातून एका हॉटेलध्ये अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी राहत्या फ्लॅटवर व तरुणीच्या घरी ३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत त्यांच्यात संबंध होते.२ मे २०१६ रोजी 'माझ्या घरच्यांना आंतरजातीय विवाह मान्य नाही' असे सांगून आदित्यकुमारने विवाहास नकार दिला आणि जातीवरून अपमानित केले, अशी फिर्याद पीडितेने विजापूर नाका पोलिसांत दिली. त्यावरून आदित्यकुमारविरूद्ध ३० ऑगस्ट २०१६ रोजी बलात्कारासह ॲट्रासिटीचाही गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त महेश जोशी यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते. सुनावणीवेळी संशयित आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राजकुमार मात्रे यांनी काम पाहिले.
काय झाला नेमका युक्तिवाद?
'अशा प्रकरणात सुरवातीपासून लग्न करण्याचा उद्देश नसताना लग्न करतो, असे खोटे आश्वासन दिल्याचे शाबीत झाल्यास आरोपीस दोषी धरता येईल. प्रस्तुत प्रकरणात सरकारपक्षाने आरोपीचा सुरवातीपासून लग्न करण्याचा हेतू नसतानादेखील लग्नाचे आश्वासन दिल्याची बाब शाबीत केलेली नाही. तरुणीच्या आरोपावरून पूर्णपणे संमतीने शारीरिक संबंध झाल्याचे दिसून येते. केवळ लग्नास नकार दिल्याने पूर्ण संमतीने झालेले शारीरिक संबंध बलात्काराच्या व्याख्येत येत नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीचा सुरवातीपासून तरुणीशी लग्न करण्याचा उद्देश नव्हता, असे म्हणता येणार नाही' असे मुद्दे मांडून ॲड. थोबडे यांनी त्या पुष्ट्यर्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी संशतियाची निर्दोष मुक्तता केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.