सांगली : जादा भाडे; 39 ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर कारवाई
सांगली : दिवाळीच्या हंगामामध्ये प्रवाशांना नियमापेक्षा जादा प्रवासी भाडे आकारून लूट करणार्या 39 खासगी ट्रॅव्हल्सवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करून 41 हजार 500 रुपयांचा दंड आकारला.
यापुढेही अशी लूट सुरु राहिल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या दरापेक्षा दीडपट प्रवाशांना भाडे आकारण्याचा अधिकार खासगी बस चालक, ट्रॅव्हल चालकाना आहे. असे असतानाही ट्रॅव्हल्स चालकांनी अवाच्या सवा भाडे आकारुन प्रवाशांची लूट करण्यात आली. 15 ते 25 ऑक्टोबरदरम्यान दिवाळी हंगामामुळे एसटी आणि रेल्वे आरक्षण फुल्ल झाले होते. यामुळे खासगी बसकडे प्रवासी मोठ्याप्रमाणात वाढले होते. विशेषत: मुंबई, पुणे, अमरावती, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी शहरासाठी मोठी गर्दी झाली होती. खासगी बसेसही फुल्ल झाल्या होत्या. या गर्दीचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल्सनी प्रवाशांकडून जवळपास पाचशे ते हजार रुपये जादा भाडे आकारले.
याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमित गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाने बसमध्ये जाऊन प्रवाशांकडे चौकशी करुन 39 बस चालक आणि कंपन्यांवर कारवाई केली. बेकायदा बसभाडे आकारल्याच्या कारणावरुन 41 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
एकाही प्रवाशाची तक्रार नाही
प्रवाशांची लूट होत असेल तर कार्यालयाकडे किंवा मेलवर तक्रार करावी असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले होते. गेल्या महिन्याभरात एकाही प्रवाशाने तक्रार केली नाही. आरटीओ कार्यालयानेच शेवटी शोधमोहीम राबवून 39 जणांवर कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.