आजपासून 'कामगार संहिता' लागू; तुमच्या पगारासह नोकरीत होणार 9 मोठे बदल, फक्त 1वर्ष काम केल्यावरही मिळणार 'हा' मोठा फायदा
देशातील कामगार व्यवस्थेत आजपासून मोठा बदल लागू झाला असून ही सुधारणा आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. नव्या कामगार संहितेमुळे देशातील 40 कोटींपेक्षा अधिक कामगारांच्या जीवनमानात ऐतिहासिक बदल घडेल, असा सरकारचा दावा आहे. ही सुधारणा केवळ कायद्यांपुरती मर्यादित नसून भारताला जागतिक मानकांच्या जवळ नेणारी पायरी मानली जाते.
नव्या संहितांनुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतन मिळण्याची हमी देण्यात आली आहे. प्रत्येक तरुणाला नियुक्तीपत्र देणे अनिवार्य केले गेले आहे. महिलांना समान वेतनासह सुरक्षित कामाचे वातावरण देण्यावर भर आहे. 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार असून फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना फक्त एका वर्षानंतर ग्रॅच्युइटी मिळण्याचा फायदा होणार आहे. 40 वर्षांवरील कामगारांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची तरतूद करण्यात आली आहे. ओव्हरटाइमसाठी दुहेरी पगार आणि धोकादायक उद्योगांमध्ये आरोग्य सुरक्षेची संपूर्ण हमी देण्यात आली आहे.
आजपासून लागू झालेल्या चार प्रमुख संहितांमध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीवरील संहिता 2020 यांचा समावेश आहे. या संहितांमुळे आधी अस्तित्वात असलेले 29 केंद्रीय कामगार कायदे दूर होऊन एकसंध नियम लागू केले जात आहेत.या बदलांचा सर्वाधिक फायदा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार, महिला कर्मचारी आणि MSME क्षेत्रातील कामगारांना होणार आहे. अॅग्रीगेटर कंपन्यांना आता त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या ठरावीक टक्केवारीप्रमाणे स्वतंत्र कल्याण निधी तयार करणे बंधनकारक असेल. घर आणि कामाच्या दरम्यान झालेला अपघातही रोजगाराशी संबंधित मानला जाईल, ज्यामुळे कामगारांना अपघात भरपाई मिळू शकेल.
कामगारांसाठी आधारशी जोडलेला युनिव्हर्सल अकाउंट नंबर लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य बदलले तरी कल्याणकारी योजनांचे लाभ कायम मिळतील. महिलांसाठी मातृत्व लाभ अधिक मजबूत करून 26 आठवड्यांची रजा, पाळणाघर सुविधा आणि वैद्यकीय बोनसची व्यवस्था करण्यात आली आहे. कुटुंबाच्या व्याख्येत सासऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे सामाजिक सुरक्षेचा लाभ कुटुंबातील अधिक सदस्यांना मिळू शकेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.