ACB ची कारवाई झाली अन् सकाळीच हातात मिळाली ऑर्डर ! 9 वर्षे विनावेतन शिक्षिका म्हणून काम करणार्या महिलेला मिळाला दिलासा
पुणे :- शिक्षिका म्हणून मुलांना शिक्षण देण्याचे काम त्या गेली ९ वर्षे विनावेतन करत होत्या. शासन शाळेला मान्यता देईल, त्यानंतर आपल्याला सर्व वेतन मिळेल, या आशेवर त्या काम करत होत्या. शाळेला २०२३ मध्ये अनुदान मिळाले. तरी त्यांना वेतन मंजूर होत नव्हते. तालुक्यातील इतर ६ शिक्षकांबरोबर त्यांनी शालार्थ आयडी मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्या इतर शिक्षकांना शालार्थ आयडी मिळून त्यांचे वेतनही सुरु झाले. पण, या महिलेला शालार्थ आयडी मिळत नव्हता. त्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याने त्यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. इतकी लाच देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे याच्यावर मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर आज बुधवारी कार्यालय सुरु होताच या शिक्षिकेला शालार्थ आयडी मिळाला. आता तिचे वेतन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील बोरगाव येथील श्रीनाथ विद्यालयात सहशिक्षिका म्हणून २०१६ पासून काम करते. पत्नीला शालार्थ आयडी नसल्याने आजपर्यंत विनावेतन काम करीत आहे. त्यासाठी शालार्थ आयडी मिळविण्यासाठी त्यांनी १६ जून २०२५ रोजी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांच्यासोबत तालुक्यातील इतर ६ शिक्षकांनी त्यांचे शालार्थ आयडी मिळणे करीता प्रस्ताव सादर केला होता. त्यांना शालार्थ आयडी मिळाले असून त्यांचा पगारही सुरु झालेले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीस शालार्थ आयडी न मिळाल्याने पगार मिळत नाही. त्यासाठी त्यांनी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याची ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भेट घेतली. मिरगणे याने शालार्थ आयडीसाठी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. इतके पैसे नसल्याने तक्रारदार काही न बोलता निघून गेले होते. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या कार्यालयातील लिपिक शिंदे याने व्हॉटसअॅप कॉल करुन उद्या तुम्हाला मिरगणे याने भेटण्यास बोलाविले आहे, असा निरोप दिला. मिरगणे हे १ लाख रुपये घेतल्याशिवाय शालार्थ आयडी देणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
पंचासमवेत तक्रारदार हे रावसाहेब मिरगणे याच्याकडे गेले. त्यांच्या केबिनमधील लोक निघून गेल्यावर तक्रारदार एकटेच आत गेले. त्यांनी पत्नीच्या शालार्थ आयडीबाबत चर्चा केली. तेव्हा मिरगणे याने सांगितले की, आता ज्या लोकांची काम झालीएत ना, सगळ्यांनी एक -एक लाख रुपये दिलेत, असे म्हणाले व रयत मधला, कुठलाबी विचारा, जेवढी सात झाली़ मध्ये पुन्हा आमच्या भावाने एक सांगितले. टेंभुर्णीच, राऊळगावच, चौधरी मॅडमच, सगळ्यांनी एक एकच केले, असे ते म्हणाले, त्यावर तक्रारदार यांनी एक एक लाख रुपये असे म्हणून माझ्याकडून किती, अशी विचारणा केली. त्यावर मिरगणे म्हणाला, मग तुम्हाला सांगा म्हणतोय की, तेव्हा तक्रारदार यांनी एक लाख एवढ न्हाय घडायच माझ्याकडून जर कमी काहीतरी, त्यावर मिरगणे याने मंगळवारी मी सांगतो तसा मार्ग करा, असे म्हणाले. तरी त्यांनी काही कमी करा, असे म्हणाल्यावर तुम्ही साहेबाला भेटा, तुमचा फायदा होईल, असे म्हणून त्याने त्याचे वरिष्ठ मोरे यांना भेटण्यास सांगितले.
शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांना मंगळवारी भेटले. पण, त्यावेळी ई ऑफिस चालू नसल्याने व त्यांनी कोणत्याही प्रकारे लाचेची मागणी न केल्याने मिरगणे याच्याविरुद्ध लाचेची कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. ५० हजार रुपयांच्या खर्या नोटा आणि ५० हजार रुपयांचा बनावट नोटांचे बंडल तयार करण्यात आले. त्यानंतर मिरगणे यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी १ लाख रुपये दिले. सापळा कारवाईसाठी असलेल्या पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांच्या सहकार्यांनी रावसाहेब मिरगणे याला पकडले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी ही कारवाई झाली. त्यानंतर बुधवारी सकाळी शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय सुरु होताच तक्रारदार यांच्या पत्नीचे शालार्थ आयडी तक्रारदार यांच्या हातात पडले. पण, त्यासाठी ९ वर्षे विनावेतन मुलांना शिकविण्याचे काम या महिला सहशिक्षिकेला करावे लागले. तसेच गेली ५ महिने या महिलेचे पती शिक्षण पुण्यात उपसंचालक कार्यालयात सोलापूरहून येत खेटे घालत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.