"फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका
बिहारमध्ये भाजप-संयुक्त जनता दलप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) बिहारमधये अभुतपूर्व विजय मिळवला. यावर प्रसिद्ध 'स्टँड अप कॉमेडियन' कुणाल कामरा याने बोचरी टीका केली आहे. कुणाल कामराने निवडणूक आयोग देखील लक्ष्य केले आहे. 'मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना नेपाळला पाठवा, तिथंही भाजपचे सरकार स्थापन होईल,' असा टोला त्याने त्याच्या 'एक्स'वरील पोस्टद्वारे लगावला आहे.
'स्टँड अप कॉमेडियन' कुणाल कामरा याने त्याच्या तिरकस शैलीतील 'पोस्ट'ला काही वेळातच लाखो 'व्ह्यूज' मिळाले आहेत. तसंच हजारो प्रतिक्रियाही नोंदवल्या गेल्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत 'एनडीए'ला अत्यंत घवघवीत यश मिळाल्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका करत आहेत.
निवडणूक हायजॅक करण्यात आली
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. 'एक्स'वरील 'पोस्ट'मध्ये त्यांनी, भाजपने आता निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्तांचे तोंड गोड केले पाहिजे. भाजपने बिहारची निवडणूक ताब्यात घेऊन 'हायजॅक' केली असल्याचे मी तीन महिन्यांपूर्वी म्हटल्याची आठवण करून दिली.
दुबार मतदानाचा फटका
'ज्ञानेशकुमार यांनी विजयाचे प्रमाणपत्रच मोदींना दिले आहे. ज्या राज्यात पाच लाख दुबार मतदार आहेत अन् 80 लाख मतदार ज्या राज्यातून वगळले आहेत, त्या राज्याचे निकाल काय असणार होते, याचा विचार सुजाणांनी करावा,' असेही संजय सिंह यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काँग्रेस शेवटपर्यंत घोळ घालते
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी नमूद केले की, बिहारमध्ये महाआघाडीचा पराभव झाला आहे हे मान्य केले पाहिजे. त्यात काही दुमत नाही. भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यासाठी लावलेला वेळ हा मुद्दा निर्णायक ठरला. काँग्रेस आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात जागावाटप अन् उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशीपर्यंत चालले होते, अशी टिप्पणी केली.
मतचोरी यात्रेला प्रतिसाद
अंबादास दानवे यांच्या या टिप्पणीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. अंबादास दानवे यांनी पुढे म्हटले की, 'राहुल गांधींच्या मतचोरीविरोधी यात्रेला प्रतिसाद लाभला होता. त्यावेळीच तेजस्वी यादव यांचा चेहरा महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करणे फायद्याचे ठरले असते.'
महाआघाडीत सामसूम
निवडणुकीतील घवघवीत यशाने 'एनडीए'गोटात उत्सव साजरा असताना महाआघाडीच्या गोटात सामसूम अन् नाराज विरोधकांची निवडणूक आयोगावर जळजळीत टीका, असं विरोधाभासी वातावरण बिहारमध्ये दिसत आहे. या निवडणुकीत महिला-मुस्लिम-यादव मतटक्का निर्णायक ठरल्याचे निरीक्षण देखील नोंदवले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.