अस्थायी सब-स्टाफ कामगार श्री. ऋषिकेश राजू कांबळे यांच्यावर अन्याय – युनियन बँक अंकली शाखेविरुद्ध वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनची कारवाई सुरू
२६ नोव्हेंबर संविधान दिना पासून निर्णय लागेपर्यंत आंदोलन सुरू...
सांगली: युनियन बँक ऑफ इंडिया (पूर्वाश्रमीची कॉर्पोरेशन बँक) शाखा अंकली येथे २०१८ पासून प्रामाणिक सेवा देणारे अस्थायी सब-स्टाफ कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांना दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी बेकायदेशीरपणे सेवेतून कमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरोधात आज मा. रावसाहेब सराटे, जिल्हा समन्वयक, युनियन बँक मुख्य शाखा सांगली यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्ह्याच्या वतीने अधिकृत तक्रार-निवेदन देण्यात आले.
कायद्याचा उघड उल्लंघन
कामगार ऋषिकेश राजू कांबळे यांनी दरवर्षी २४० हून अधिक दिवस सेवा पूर्ण केली असून ते औद्योगिक विवाद कायदा १९४७ अन्वये “सातत्यपूर्ण सेवा” धारण करत होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश —
“Maintain Status Quo of Shri Rushikesh Kamble” —
असतानाही स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी मनमानी करत त्यांना सेवेतून कमी केले.
यामुळे कलम २५F, ३३(१)(a) तसेच कामगारांच्या मूलभूत हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. या प्रकरणी मा. केंद्रीय औद्योगिक न्यायाधिकरण (CGIT), मुंबई येथे दोन खटले न्यायप्रविष्ट आहेत.
अनुसूचित जातीतील कामगारावर अन्याय
अनुसूचित जातीतील या कामगारावर झालेला अन्याय अत्यंत गंभीर असून, कुटुंब उपजीविकेच्या संकटात सापडले आहे.
स्थिती सुधारली नाही तर धरणे आंदोलन करण्यास भाग पडेल असा युनियनचा प्रकटपणे इशारा देण्यात आला आहे.
आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की,
२६/११/२०२५ (संविधान दिन) पासून
युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा अंकली
येथे शाखेच्या आवारात पिडीत कामगार, ऋषिकेश राजू कांबळे व त्यांच्या कुटुंबासह बेमुदत शांततामय धरणे आंदोलन करण्यात येईल.
युनियनने स्पष्ट केले आहे की,
“आमचे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून अन्यायी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर निर्णयांविरुद्ध आहे.”
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या प्रमुख मागण्या मा. रावसाहेब सराटे, जिल्हा समन्वयक, युनियन बँक मुख्य शाखा सांगली यांच्याकडे लेखी सादर केल्या आहेत.
1. श्री. ऋषिकेश राजू कांबळे यांची तत्काळ सेवेत पुनर्स्थापना
2. बेकायदेशीर कमी केल्यानंतरचा थकबाकी वेतन, बोनस व इतर लाभ
3. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाखा व्यवस्थापकांवर शिस्तभंग कारवाई
4. औद्योगिक विवाद कायदा आणि 12th Bipartite Settlement नुसार न्याय
युनियनच्या वतीने
कारवाईचे नेतृत्व मा. प्रशांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, निवेदन संजय भूपाल कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांनी सादर केले.
यावेळी, सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, महानगरपालिका अध्यक्ष युवराज कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष असलम मुल्ला, कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन, मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार यांच्या सोबत पिडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी निवेदनाद्वारे युनियनने प्रशासनाला विनंती केली आहे की परिस्थिती शांततेत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.