Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचा खानापूर-आटपाडी बालेकिल्ला ढासाळतोय! कार्यकर्ते निघाले महायुतीकडं, विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांवर आरोप:, स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर आव्हान

काँग्रेसचा खानापूर-आटपाडी बालेकिल्ला ढासाळतोय! कार्यकर्ते निघाले महायुतीकडं, विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांवर आरोप:, स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर आव्हान


खानापूर मधील माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे संघटन बिघडल्याचे चित्र आहे. प्रमुख नेत्यांचे कार्यकर्त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्त्यांनी महायुतीची वाट धरायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे काँग्रेसची अवस्था सध्या बिकट बनत चालली आहे. शिवाय स्थानिक नेत्यांची महायुतीतील नेत्यांमध्ये सलगी वाढल्याने कार्यकर्त्यांची नाराजी वाढली आहे.

खानापूर तालुका एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याच बालेकिल्ल्यातून काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, दिवंगत नेते संपतराव माने यांनी काँग्रेसचा गड शाबूत ठेवला होता. तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत संपर्क ठेवल्याने काँग्रेसने चांगला गड भक्कम केला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहिली तर याच खानापूरमध्ये काँग्रेसची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून तळागाळातील कार्यकर्त्यांचा विसर नेत्यांना पडला आहे. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम हे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कार्यकर्ते दबके आवाजात करताना दिसत आहेत.

कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीतील शिवसेनेच्या वाटेवर गेले आहेत. आमदार सुहास बाबर यांच्याकडे काही कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीकडे देखील काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष देत नसल्याने मूळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आणि नाराजी वाढली आहे.

स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर आव्हान

दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम व्यवस्था असल्याने स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीच्या उमेदवारांपुढे सामान्य कार्यकर्त्यांचा निभाव लागणे अशक्य आहे. या निवडणुकीच्या तोंडावर तरी खासदार आणि आमदारांनी याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी मूळ कार्यकर्त्यांची आहे. अन्यथा निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.