'छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे, कन्नड वंशाचे होते'; कन्नड साहित्यिकाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
बेळगाव : दरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य करून अपमान करण्याचा प्रयत्न कन्नडिगांकडून सातत्याने केला जात असून, रविवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रा.चिं. ढेरे यांच्या साहित्याचा चुकीचा संदर्भ देत साहित्यिक वाय. आर. पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठी भाषिक आणि मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कर्नाटक राज्य विकास संघटनेतर्फे कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात साहित्यिक वाय. आर. पाटील यांनी, बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे व कन्नड वंशाचे होते, असा उल्लेख रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याचा चुकीचा संदर्भ देत केला आहे.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे लिंगायत समाजाचे होते, अशी मुक्ताफळे उधळली. यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. तसेच, विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्याची काहीही गरज नव्हती, अशाही प्रतिक्रिया उमटल्या.जिल्हा पालक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच आमदार आसिफ सेठ, भीमराव पवार, हुबळीचे पोलिस निरीक्षक डॉ. ज्योतिर्लिंग होनकट्टी, सुभाष नेत्रेकर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.साहित्यिक पाटील यांनी, 'कन्नड ही इतर सर्व भाषांना मागे टाकून वाढली आहे. ब्रिटिश काळातही कन्नडला महत्त्व देण्यात आले. बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी भाषांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे होते. ते लिंगायत होते आणि त्यांचे कुलदैवत श्रीशैल मल्लिकार्जुन होते. यावरून कन्नड आणि मराठीचे नाते किती मजबूत आहे याचा हा पुरावा आहे', असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला.पाटील यांचे ज्ञान अर्धवट असल्याचे यावेळी दिसून आले. तसेच, यापूर्वीही छत्रपती शिवरायांवरून कर्नाटकातील नेत्यांनी खळबळजनक दावे केले होते, त्यामध्ये साहि.ित्यक पाटील यांची भर पडल्याच्या प्रतिक्रिया मराठा समाजातील पदाधिकारी व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्व जगाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्याबद्दल चुकीचा इतिहास सांगून संभ्रम निर्माण करणे अतिशय चुकीचे आहे. याचा प्रत्येकाने जाहीर निषेध करावा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती खपवून घेतली जाणार नाही. अठरापगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य या राजाने केले आहे. याचा प्रत्येक मराठ्याला अभिमान आहे. साहित्यिक पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध आहे.
- गुणवंत पाटील, पदाधिकारी, सकल मराठा समाज
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.