इस्लामपूर : येथील रसिका मल्लेश कदम (वय 35, रा. नवीन बहेनाका) या बेपत्ता विवाहितेचा मृतदेह शुक्रवारी कृष्णा नदीपात्रात साटपेवाडी बंधार्याजवळ सापडला. चारित्र्याच्या संशयावरून तुकाराम शंकर वाटेगावकर (वय 38, रा.बोरगाव, ता. वाळवा) या संशयिताने तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. तुकाराम याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रसिका हिचा मुलगा ओंकार याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रसिका कदम ही येथील बहेनाका परिसरात राहत होती. तिचा पती कर्नाटक येथे कामाला आहे. रसिका ही खानावळीत, तसेच धुणी-भांड्याचे काम करीत होती. सात वर्षांपूर्वी रसिका ही एका खासगी रुग्णालयात काम करत असताना तिची तुकाराम याच्याशी ओळख झाली. त्यातून दोघांत आर्थिक देवाण-घेवाण होत होती. दोघांतील प्रेमसंबंधाची चर्चाही गावात होती. रसिका ही वारंवार तुकाराम याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होती. त्यातून त्यांच्यात खटके उडत होते. तुकाराम हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालत होता.मंगळवारी (दि. 4) सायंकाळी तुकाराम हा त्याच्या दुचाकीवरून इस्लामपूर येथील रसिकाच्या घराकडे गेला. त्याने तिला पैशाचे आमिष दाखवले. दोघे दुचाकीवरून इस्लामपुरातील एका मंगल कार्यालयाजवळ आले. तुकाराम याने त्याची दुचाकी तेथे लावली. दोघे रसिका हिच्या दुचाकीवरून (एमएच 11 सी. यु. 6514) बोरगाव येथील तुकाराम याच्या वस्तीवरील शेडकडे गेले. तेथे रात्री पैशावरून, तसेच चारित्र्याच्या संशयावरून दोघांत वादावादी झाली. त्यावेळी संशयित तुकाराम याने रसिकाचा गळा आवळून खून केला व मृतदेह पोत्यात भरला. रसिकाच्याच दुचाकीवरून ते पोते ताकारी येथे पुलावर नेले व पोत्यासह मृतदेह नदीपात्रातील पाण्यात फेकला. त्यानंतर तिची दुचाकीही पाण्यात फेकली. दुसर्यादिवशी बुधवारी तुकाराम इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाला व त्याने रसिका हिच्या खुनाची माहिती पोलिसांना दिली.
चौथ्या दिवशी मृतदेह सापडला...
बुधवारी, गुरुवारी इस्लामपूर पोलिस व आयुष पथकाने बोटीच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली होती. बुधवारी रात्री तिची दुचाकी सापडली होती, तर चौथ्या दिवशी रसिकाचा मृतदेह ताकारी पुलापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर साटपेवाडी बंधार्यानजीक सापडला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. रसिकाचा गळा आवळल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे.
पाच वर्षांपूर्वी रसिकाची तक्रार...
पाच वर्षांपूर्वी रसिका हिने तुकाराम याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. तुकाराम याने रसिका हिला शिवीगाळ, दमदाटी केली होती. याप्रकरणी रसिका हिने तुकाराम याच्याविरोधात इस्लामपूर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी तुकाराम याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता, असे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितले.
गुन्ह्यात आणखी कोणाची मदत?
तुकाराम याने मृतदेह पोत्यात भरताना त्याला कोणी मदत केली का? मृतदेह घेऊन जाताना त्याच्याबरोबर आणखी कोण होते? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आणखीन नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांकडून तुकाराम याच्याकडील तांत्रिक माहिती घेतली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.