Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऊसदरप्रश्नी सांगलीतील साखर कारखानदारांना 'स्वाभिमानी'चा ८ दिवसांचा अल्टिमेटम

ऊसदरप्रश्नी सांगलीतील साखर कारखानदारांना 'स्वाभिमानी'चा ८ दिवसांचा अल्टिमेटम


सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी असा आग्रह धरला आहे की, साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन कोणतीही कपात न करता तीन हजार ७५१ रुपये दर जाहीर करूनच गळीत हंगाम सुरू करावा. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदारांनी दराची घोषणा केली आहे. 

परंतु सांगली जिल्ह्यातील सोनहीरा कारखाना वगळता, काही कारखान्याने दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केला आहे. या कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्हाधिकारी यांना ऊस दराची कोंडी फोडण्याची मागणी केली आहे.



सांगली जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांमध्ये गळीत हंगाम सुरू होणार असून, त्यापैकी बहुतेक कारखान्यांनी प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सोनहीरा कारखान्याने प्रतिटन तीन हजार ३०० रुपयांहून अधिक दर देण्याची घोषणा केली आहे. 

मात्र, उर्वरित राजाराम बापू पाटील, क्रांती, हुतात्मा, विश्वासराव नाईक, दत्त इंडिया या कारखान्यांनी कोणतीही दराची घोषणा न करता गळीत हंगाम सुरू केला आहे. या कारखानदारांच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादकांना नक्की किती दर मिळणार हे स्पष्ट नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत दराची कोंडी न फोडल्यास वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.



कारखानदारांना उपपदार्थांमधून कोट्यवधींचा फायदा

चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ७५१ रुपये दर मिळणे आवश्यक आहे. मागील हंगामातील २०० रुपयांचा हप्ता न दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये, अशी मागणी आहे. ही मागणी सखोल अभ्यास करून करण्यात आली आहे. कारण, मागील वर्षभरात साखरेचा दर प्रतिक्विंटल साडेतीन हजार आठशे रुपये होत असताना, कारखान्यांनी इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिस यांमधून कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरीही शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळणे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

तोडणी-वाहतूक खर्च ७५० रुपयांपेक्षा जास्त नको

साखर कारखानदारांनी ऊस तोडणी व वाहतूक कपात २५ किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे. २५ किलोमीटरपर्यंत ७५० रुपयांचा तोडणी व वाहतूक कपात मान्य आहे. मात्र, त्याहून अधिक अंतरावरील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील सर्व सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून प्रतिटन तीन हजार ७५१ रुपये दराची मागणी केली आहे. तसेच मागील गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये देण्याची मागणी केली आहे. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत कारखानदारांनी दराची कोंडी फोडली नाही तर सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम बंद पाडण्यात येईल. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची गरज असल्याचेही नमूद केली आहे. - संदीप राजोबा, जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.