सोलापूर :- लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये
सोलापूर : शेतकऱ्याने कृषी अवजारांसाठी केलेल्या अर्जास पूर्व संमती देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचा कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१, रा. बाळे) याने आठ हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २६) त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या घराची झडती घेताना तेथे सहा पोती कांद्याचे बियाणे सापडले आहे.
तक्रारदाराने शेतीच्या अवजारासाठी काही महिन्यापूर्वी ऑनलाइन अर्ज केला होता. त्याला पूर्व मंजुरी मिळत नसल्याने त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात हेलपाटे मारले. त्यावेळी अर्जास पूर्व मंजुरी तथा संमती देण्यासाठी धनंजय शेटे याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी (ता. २५) लगेचच काही वेळात पैसे आणून दे, असे शेटे तक्रारदारास म्हणाला होता. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी लगेचच सापळा लावला, पण कृषी अधिकारी शेटे याने दुपारनंतर तक्रारदाराचा फोन उचलला नाही. लाचेची रक्कम बुधवारी सकाळी द्यायची ठरले. त्यानुसार तक्रारदार पैसे घेऊन तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी कागदातील पैसे फाईलमध्ये ठेवायला सांगितले.पैसे ठेवलेले फाइल शेटे याने पंचासमक्ष स्वत:कडे घेऊन ठेवली. त्यावेळी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश पवार, रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वात अंमलदार सलीम मुल्ला, श्रीराम घुगे, स्वामीराव जाधव, राजू पवार, अक्षय श्रीराम या पथकाने पार पाडली. कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली. हा शेटे पाच वर्षांपूर्वीच अधिकारी म्हणून नोकरीला लागला होता.
कांद्याचे बियाणे घरी कसे?
लाच घेणारा धनंजय शेटे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड येथील रहिवासी आहे. त्याला उद्या (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच्या घरात काही दागिने, साहित्य व सहा पोती कांद्याचे बियाणे आढळल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते बियाणे त्याच्या घरी कसे, याचा तपास अधिकारी करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.