मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी 08 ऑक्टोबर रोज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित होती.
न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे 20 ऑक्टोबरला सुनावणी लागली होती. मात्र शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या सुनावणीसाठी पुढील तारीख म्हणजेच आजची (12 नोव्हेंबर) तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
राज्यात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी मागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. या अर्जाची दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मूळ याचिकाही निकाली काढण्याचे संकेत दिले होते. याआधी या प्रकरणावर 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती. परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात न्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती. यानंतर 8 ऑक्टोबला सुनावणी अपेक्षित होती, मात्र आता न्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज 19 क्रमांकावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज निकाल कोणाच्या बाजूने लागतो? हे पाहावे लागेल.दरम्यान, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने 37 आमदारांच्या बहुमताच्या आधारावर सत्ता मिळवली. तसेच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. त्यानंतर बंडखोरी केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे धाव घेतली. मात्र राहुल नार्वेकर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांनाच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यामुळे ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जानेवारी 2024 च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत शिंदे आणि 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्या कोणाच्याही बाजूने लागला तर त्याच्या परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर दिसण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.