Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!

हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!


हनिमून म्हणजे प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील सुवर्णकाळ. हे क्षण आयुष्यभर लक्षात राहावे म्हणून अनेक जण खूप प्लॅनिंग करतात. आपल्या जोडीदाराला घेऊन एखाद्या रोमँटिक ठिकाणी फिरायला जायचं, हे तर प्रत्येकाच्या यादीत असतं. यासाठी काही ट्रॅव्हल कंपन्या खास हनिमून पॅकेज देखील देतात. मात्र, या पॅकेजनेच एखाद्या जोडप्याची फसगत झाली तर... फरीदाबादमध्ये एका जोडप्यासोबत हनिमून ट्रीपच्या सुरुवातीलाच असं काही घडलं की परदेशात त्यांना मोठा धक्का बसला.

फरीदाबादच्या राकेश बंसल यांनी हनिमूनसाठी एका ट्रॅव्हल कंपनीकडून दुबई पॅकेज घेतले होते. त्यांनी या कथित ट्रॅव्हल कंपनीकडून तब्बल ५ लाखांचे एक असे व्हेकेशन पॅकेज घेतले होते, ज्यात ५ वर्षांसाठी काही आंतरराष्ट्रीय सहली सामील होत्या. यातील एक ट्रीप म्हणून त्यांनी दुबईचे हनिमून पॅकेज बुक केले होते. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी, बंसल जोडप्याने कंपनीला सर्व आवश्यक कागदपत्रे आणि पेमेंट देऊ केले. त्यानंतर कंपनीने अतिरिक्त सुविधांसाठी ₹३.३० लाखांची मागणी केली, जी राकेश यांनी ऑनलाइन ट्रान्सफर केली. कंपनीने त्यांना आश्वासन दिले की, नोव्हेंबरमध्ये दुबई ट्रिप दरम्यान त्यांना ५-स्टार हॉटेल, विमान तिकिटे, टॅक्सी आणि इतर सुविधा प्रदान केल्या जातील.

दुबईच्या हॉटेलमध्ये गेले अन्..

१५ नोव्हेंबर २०२४ रोजी, हे जोडपे स्वखर्चाने दुबईला पोहोचले आणि कंपनीने सांगितलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी चेक केले. हॉटेल मध्ये पोहोचल्यावर रिसेप्शनवर त्यांनी त्यांचे बुकिंग कार्ड दाखवले तेव् त्यांना मोठा धक्का बसला. तुमच्या नावावर अथवा या कार्डवर कोणतेही बुकिंग नसल्याचे हॉटेलकडून सांगण्यात आले. या हॉटेल रूम नाकारल्यानंतर, त्यांना स्वतःच्या पैशांचा वापर करून सात दिवसांसाठी हॉटेल बुक करावे लागले.

या काळात राकेशने कंपनीच्या प्रतिनिधींशी फोन आणि ईमेलद्वारे अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. इतकंच नाही तर, दुबईहून दिल्लीला परतण्यासाठी त्यांना स्व:खर्चाने विमान तिकीट खरेदी करावे लागले.

आयोगाने कंपनीला नोटीस बजावली!
भारतात परतल्यानंतर, पीडित जोडप्याने फरीदाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे फिर्याद दाखल केली. आयोगाने कंपनीला नोटीस बजावून उत्तर मागितले, परंतु त्यावेळीही कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. त्यानंतर, आयोगाने या प्रकरणाची एकतर्फी सुनावणी केली, ज्यामध्ये कोर्टाने असे म्हटले की, कंपनीने ग्राहकांचा विश्वास भंग केला आहे, कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे आणि त्यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला आहे.

आयोगाचे अध्यक्ष अनिल कुमार पुंडिर आणि सदस्य अंजू यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, हे सेवेतील त्रुटीचे प्रकरण आहे. म्हणून, कंपनीने ग्राहकांना ९% वार्षिक व्याजासह १० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावेत. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात अशी फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, असेही आयोगाने म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.