कोल्हापूर : टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच पेपर फोडणाऱ्या टोळीचा रविवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, तितकेच लोक ताब्यात घेतले आहेत. कागल तालुक्यातील मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. मुख्य सुत्रधार असलेल्या महेश भगवान गायकवाड (सातारा ) याचा शोध पोलीस पथक घेत आहे.
याप्रकरणी गुरुनाथ गणपती चौगले (रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी ), किरण साताप्पा बरकाळे, (रा.देंगेवाडी,ता. राधानगरी ), अभिजित विष्णू पाटील (रा. बोरवडे ता. कागल ), रोहित पांडुरंग सावंत (रा. कासारपुतळे ता. राधानगरी) या चार शिक्षकांसह नागेश दिलीप शेंडगे (रा. सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी ), राहुल अनिल पाटील ( शिंदेवाडी ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (तमनाकवाडा, ता. कागल ), दत्तात्रय आनंदा चव्हाण (कासारपुतळे, ता. राधानगरी), अक्षय नामदेव कुंभार (सोनगे, ता. कागल ) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. अन्य नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी टीईटी परीक्षा (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेच्या उमेदवारांकडून मूळ कागदपत्रे व काही रक्कम घेवून परीक्षेपूर्वी पेपर मिळवून देतो, असे सांगणारी टोळी कागल व राधानगरी तालुक्यात कार्यरत होती.दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे परीक्षेच्या अगोदर रात्री विद्यार्थ्यांना पेपरची छायांकित प्रत देत असत. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अगोदर रात्री संबंधित विद्यार्थी संबंधित उमेदवारांना सोनगे येथे बोलावून मूळ कागदपत्रांसह प्रत्येकाकडून रोख तीन लाख घेवून पेपरची छायांकित प्रत देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे आदींची चार तपास पथके तयार केली.
पथकाने शिवकृपा फर्नीचर मॉल या फर्नीचर दुकानामध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे अटक केलेल्यासह पाच विद्यार्थीही होते. पथकाने वेगवेगळ्या शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांची नावे असलेली पदविकेची कागदपत्रे, कोरे धनादेश चेक, प्रिंटर व इतर असे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.