आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू
काशीबुग्गा (आंध्र प्रदेश) - व्यंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. भाविकांच्या गर्दीमुळे रेलिंग तुटले आणि अनेकजण खाली कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
काशीबुग्गा येथील व्यंकटेश्वराचे मंदिर प्रसिद्ध असून, कार्तिकी एकादशीमुळे मोठी गर्दी झाली होती. पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या रांगेचे रेलिंग तुटल्यामुळे भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. त्यात सातजणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर दोन जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे श्रीकाकुलमचे जिल्हाधिकारी स्वप्नील पुंडकर यांनी सांगितले.
मृतांमध्ये आठ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. 'हे मंदिर खासगी मालकीचे असून, एकादशीमुळे भाविकांची गर्दी होईल, याविषयी कोणतीही कल्पना प्रशासनाला देण्यात आली नव्हती,' असे देवस्थान कामकाजमंत्री अनम रामनारायण रेड्डी यांनी सांगितले. कृषिमंत्री किंजारापू अचन्नायडू यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.
जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्यात येत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. जखमींना चांगले उपचार मिळावेत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, घटनास्थळावर मदतकार्यावर लक्ष ठेवण्यास अधिकारी व स्थानिक नेत्यांना सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.