नवी दिल्ली : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (डीके) यांनी पुरेसे आमदार जमवले तर भारतीय जनता पक्ष त्यांना कर्नाटकचे 'एकनाथ शिंदे' करू शकतात. तसे झाले तर हातातून मोठे राज्य निसटेल, अशी भीती काँग्रेस 'हायकमांड'ला वाटू लागली आहे. त्यामुळेच काँग्रेसमधील फूट आणि राज्यातील सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा वाद विकोपाला गेला असून, राहुल गांधींनी सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही, तर खरगेंच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो. कर्नाटकमधील संघर्षावर हायकमांड निर्णय घेईल, असे सांगून खरगेंनी ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचेही सूचित केले आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची खरगेंची संधी तीन वेळा हुकली होती, आता ही कदाचित शेवटची संधी असल्याचे खरगेंना वाटत आहे. शिवाय, बिहारमधील नामुष्कीजनक पराभवानंतर काँग्रेसने आत्मविश्वास गमावलेला आहे. पक्षाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि त्यांचे निकटवर्तीय घेत आहेत. खरगेंकडे दिल्लीत पक्षाची सूत्रेही राहिलेली नाहीत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री होणे अधिक योग्य आहे, असा विचार खरगेंकडून होत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
…तर डीकेंना अन्य पर्याय
मी नसेन तर खरगेंना मुख्यमंत्री करा,' असे अडीच वर्षांपूर्वी डीकेंनी स्वतःच राहुल गांधींना सांगितले होते. त्यांच्या विधानाची आठवण दिल्लीतील बैठकीत डीकेंना करून दिली जाऊ शकते. सहमतीचा चेहरा म्हणून खरगेंना सोनिया गांधींनी पाठिंबा, तर सिद्धरामय्या व डीके या दोघांचीही मान्यता मिळू शकते. सोनियांचा कल खरगेंकडे असला तरी राहुल गांधींची पसंती अजूनही सिद्धरामय्याच असल्याचे सांगितले जाते. सोनियांनी या वादात हस्तक्षेप न करण्याचे ठरवले तर मात्र हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांच्या पारड्यात वजन टाकले तर मात्र डीकेंना राजकीय पर्याय शोधावा लागणार आहे.
भाजपकडून 'डीकें'च्या ताकदीची चाचपणी
- काँग्रेसमधील समर्थक आमदारांच्या मोठ्या गटासह बाहेर पडून भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचा डीकेंचा डाव असल्याचे सांगितले जाते. या शक्यतेची चर्चा तीन-चार महिन्यांपासून बोलून दाखवली जात होती.– अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपद देण्याचे हायकमांडचे आश्वासन पाळले गेले नाही तर डीके नोव्हेंबरच्या अखेरीला काँग्रसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, असे त्यांचे समर्थक खासगीमध्ये सांगत होते. – सध्या डीकेंच्या ताकदीचा भाजप अंदाज घेत आहे. ते कर्नाटकचे 'एकनाथ शिंदे' ठरले तर त्यांना पाठिंबा देऊन डीके-भाजप सरकार कर्नाटकमध्ये आणण्याचा प्रयत्न होईल. भाजप डीकेंच्या पुढच्या निर्णयाची तर, डीके राहुल गांधींच्या निर्णयाची वाट पाहात आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.