राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ५ व्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या मुलींनी पदकांची लयलूट करीत दिवस गाजविला. सांगलीत चहाचा गाडा चालविणाऱ्या महादेव सलगर यांची मुलगी काजोल सलगरने सुवर्ण लिफ्टींगचा करिश्मा घडविला, तर सायकलिंग शर्यतीत आहिल्यानगरच्या अपूर्वा गोरेने कांस्यपदकाची कमाई केली.
बिकानेर येथील वेटलिफ्टिंग स्पर्धेत, शिवाजी विद्यापीठाच्या काजोल सरगरने महिलांच्या ४८ किलो गटात एकूण १५८ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. २०२२ च्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी महाराष्ट्रातील सांगलीची १९ वर्षीय काजोलने स्नॅचमध्ये मोठी आघाडी घेत अव्वल स्थान कायम राखले.
सांगलीतील वालचंद महाविद्यालयात कला शाखेत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या काजोलचे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णयश आहे. तिचे वडिल महादेव सनगर हे सांगलीत चहाचा गाडा चालवितात. तिला मयूर सिंहासने, कोल्हापूरच्या डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
काजोलने दुसऱ्या प्रयत्नात ७३ किलो वजन उचलले, जे चंदीगड विद्यापीठाच्या राणी नायकपेक्षा सात किलो जास्त आहे. त्यानंतर तिने क्लीन अँड जर्कमध्ये ८५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. बेरहमपूर विद्यापीठाच्या रिंकी नायकने तिच्या तिसऱ्या प्रयत्नात एकूण ८६ किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये अव्वल स्थान पटकावले, एकूण १४९ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले, तर राणी नायकने एकूण १४८ किलो वजन उचलून कांस्यपदक कमवले.जयपूरमधील महिलांच्या वैयक्तिक टाइम ट्रायल सायकलिंग स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहिल्यानगरच्या अपूर्वा गोरेने कांस्यपदकाची कमाई केली. गुरु नानक देव विद्यापीठाच्या सायकलपटू मीनाक्षी रोहिलाने ००:४५:३१.९०७ वेळेसह स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकले.राजस्थानच्या पूजा बिश्नोईने ००:४६:५२.००३ वेळेसह रौप्य तर अपूर्वा गोरेने ००:४७:२४.९३३ वेळेसह कांस्य पदक जिंकून पदकाचे खाते उघडले. आहिल्यानगरमधील जनता महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असलेल्या अपूर्वा गोरेने २०२२ मधील खेलो इंडिया युवा स्पर्धेत रूपेरी यशाला गवसणी घातली होती. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेचे पाचवे पर्व राजस्थानमधील सात शहरांमध्ये रंगली आहे. देशातील २२२ विद्यापीठांमधील ४,४४८ खेळाडू २३ पदक स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत.
राजस्थान सरकारच्या राज्य क्रीडा परिषदेच्या सहकार्याने भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धेचे संयोजन केले आहे. स्पर्धेत महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपली विजयी वाटचाल कायम राखली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.