Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाकरी फिरली? दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब? अजित पवार म्हणाले, 'माझं शरद पवार साहेबांशी...'

भाकरी फिरली? दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब? अजित पवार म्हणाले, 'माझं शरद पवार साहेबांशी...'


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीमधील घटक पक्षांकडून काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विभक्त लढणार आहे. असं असतानाच उभी फूट पडलेल्या शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादीचेही दोन्ही गट एकमेकांसोबत युती करण्यासंदर्भातील चर्चा आहे.

याबद्दल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसंदर्भातील युतीबद्दल विचारलं असता अजित पवारांनी, "मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या भागात जे जे वाटतं जे योग्य वाटत ते त्या ठिकाणी करा," असं उत्तर दिलं.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीसंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्र्‍यांनी संभाव्य युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष युती करणार का? असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी, "त्यासंदर्भात मी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आज मला पुण्यातले स्थानिक पदाधिकारी भेटले. दोन्ही शहराध्यक्ष आणि आमदार भेटले. सगळे माजी नगरसेवक पण भेटले. त्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही चाचणी करा. मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्याबद्दल निर्णय घेऊ," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना, "अजून महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला नाही त्यामुळे काय काय होतं आणि कसं कसं होतं ते पहावं लागेल," असं अजित पवार म्हणाले.

त्यावरुनच अंदाज येईल?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बोलताना अजित पवारांनी, "निवडणुका होऊन खूप दिवस झाले आहेत. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये आमचं काम सुरू आहे. पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. कुठल्या कुठल्या शहरात काय काय घडतं हे साधारणतः लवकर समजेल. त्यावरुनच अंदाज घेता येईल. अंदाज आला की पुढच्या गोष्टी ठरवता येतील," असं सूचक विधान केलं.
युतीबद्दल शरद पवारांशी चर्चा?

युतीसंदर्भात काही बोलणं झालं का याबद्दल विचारलं असता अजित पवारांनी, "माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालेलं नाही. कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडत असतात. मी सगळ्या भागातल्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चाचणी करा आणि ठरवा," असं उत्तर दिलं. तसेच, " मी काही ही पहिली निवडणूक आम्ही लढत नाहीये. आम्ही लोकांनी अशा कित्येक निवडणुका लढल्या आहेत. हे आम्हाला नवीन नाही. आमच्यामध्ये एकोपा राहून निवडणुका लढू," असं अजित पवार म्हणाले.

तुम्ही काळजी नका करू
"सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि युतीबाबत काय तो योग्य निर्णय घेऊ. आम्ही आमच्या पक्षाचे बघू, तुम्ही काळजी नका करू," असं अजित पवार म्हणाले. बेरजेच्या राजकारणासंदर्भात विचारलं असता त्यांनी, "राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र देखील नसतो असं म्हणतात," अशी आठवण करुन दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.